औरंगाबाद – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे. मात्र, आता लस घेण्यास प्रतिसाद मंदावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ १०.९४ टक्केच लसीकरण झाले असल्याने संभाव्य तिसरी लाट रोखण्याचे आव्हान कायम आहे. शहरातही कोरोनाचे दोन्ही डोस घेणऱ्यांची संख्या १६.९९ टक्के आहे, तर ग्रामीण भागात हीच टक्केवारी ७ .७६ एवढी नोंदली गेली आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाला लोकांकडून प्रतिसाद वाढला होता. तर दुसरीकडे त्याचवेळी लसींचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी गेल्या तीन महिन्यात अनेकदा लसीकरण मोहिमेत खंड पडत आहे. त्यामुळे १६ जानेवारी ते २१ ऑगस्टपर्यंत या सात महिन्यात शहर व ग्रामीण मिळून जिल्ह्यात केवळ १०.९४ टक्के नागरिकांचेच दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३०.१७ टक्के नोंदली आहे. जिल्हाभरात कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट ३२ लाख ८७ हजार ८१४ झाले आहे. याप्रमाणात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र लसींचा तुटवड्यामुळे आजवर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या १५ टक्क्यांपर्यंतही पोचली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन म्युटेशनचे रुग्ण आढळल्यास संसर्गाची साथ अधिक गतीने पसरण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
शहरात ६.७६ लाख जणांचे लसीकरण –
शहरात महापालिकेने कोरोना लसीकरणाचे लक्ष्य ११ लाख ७६ हजार ९९९ निर्धारीत केले आहे. तथापि, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कोरोना लसीकरणाची टक्केवारी अधिक आहे. प्राप्त अहवालानुसार शहरात सध्यस्थितीत ६ लाख ७६ हजार ४४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र यात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या फक्त १ लाख ९९ हजार ९९७ एवढी आहे. दुसऱ्या डोसचे हे प्रमाण नियोजित लक्षांकाच्या तुलनेत फक्त १६.९९ टक्के एवढे आहे.
ग्रामीणमध्ये ७.५६ टक्केच दुसरा डोस पूर्ण –
ग्रामीण भागात एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरणाचे लक्ष्य २१ लाख १० हजार ८१५ इतके निर्धारीत केले आहे. त्याप्रमाणात आजपर्यंत ग्रामीणमधून २४.४४ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसऱ्या डोसचे प्रमाण फक्त ७.५६ टक्के एवढे आहे. ग्रामीणमध्ये १ लाख ५९ हजार ६८१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरण वाढवण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.