Indo-Bhutan Railway: हिमालयीन देशाशी नव्या संबंधांची सुरुवात दिल्लीपासून थेट काश्मीरपर्यंत रेल्वे प्रवासाचं स्वप्न आता साकार होण्याच्या उंबरठ्यावर आहे. काश्मीर खोऱ्याला आधीच रेल्वे मार्गाने जोडण्यात आलं असून, लवकरच तिथे नियमित रेल्वे सेवा सुरू होणार आहे. त्यासोबतच, आणखी एक मोठी बातमी म्हणजे भारत आणि भूतान यांना थेट जोडणारा पहिला रेल्वे मार्गही आता प्रत्यक्षात येणार आहे.
भूतानशी नव्या भागीदारीचा मार्ग मोकळा
भारताने बांगलादेश आणि म्यानमारशी रेल्वे मार्ग विकसित करण्याचे मोठे स्वप्न पाहिले होते. त्रिपुराच्या अगरतळ्याला (Indo-Bhutan Railway) बांगलादेशच्या अखौरा शहराशी जोडणारा रेल्वे मार्ग जवळपास तयारही झाला होता. मात्र, बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे हा प्रकल्प अडचणीत आला. त्याचप्रमाणे, मणिपूर आणि मिजोरममधून म्यानमारला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पालाही 2021 मध्ये म्यानमारमध्ये लष्करी राजवट लागू झाल्यामुळे मोठा धक्का बसला. भारत, म्यानमार, थायलंड आणि कंबोडियापर्यंत जाणारा ट्रान्स-एशियन रेल लिंक या राजकीय अस्थिरतेमुळे रखडला आहे.
भारत आणि भूतानला थेट जोडणारा रेल्वेमार्ग असमच्या कोकराझार जिल्ह्याला भूतानच्या गेलेफू शहराशी जोडणार आहे. हा प्रकल्प दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध आणखी बळकट करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जवळपास 3,500 कोटी रुपये गुंतवण्याचा अंदाज आहे.
किती लांब असेल हा रेल्वेमार्ग?
पूर्वोत्तर सीमारेषा रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावित रेल्वे मार्गाची एकूण लांबी 69.04 किलोमीटर असेल. हा मार्ग कोकराझारपासून सुरू होऊन थेट भूतानच्या गेलेफूपर्यंत जाणार आहे. या प्रकल्पाची सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार असून तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
किती स्टेशन आणि पूल उभारले जाणार?
या रेल्वे मार्गावर एकूण 6 नवीन स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये बालाजान, गरूभाषा, रूनीखाटा, शांतिपुर, दादगिरी आणि गेलेफू या स्टेशनचा समावेश असेल. तसेच, 2 मोठे पूल,29 प्रमुख पूल, 65 लहान पूल,1 रोड ओव्हरब्रिज,39 रोड अंडरब्रिज आणि 11 मीटर लांबीचे 2 छोटे पूल बांधण्यात येणार आहेत.
व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना
या नव्या रेल्वे मार्गामुळे भारत आणि भूतानमधील (Indo-Bhutan Railway) व्यापार, पर्यटन आणि सामान्य लोकांचा प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होणार आहे. हे भारताच्या शेजारी प्रथम धोरणाचं उत्कृष्ट उदाहरण ठरेल. भारतासाठी भूतान हा नेहमीच जवळचा मित्र राहिला आहे, आणि हा प्रकल्प दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सामाजिक सहकार्याला नवी दिशा देईल.