कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
इंडस हेल्थ प्लस या प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी क्षेत्रामधील अग्रणी कंपनीने आज कोल्हापूरमध्ये भित्ती-चित्रकला उपक्रमाचे आयोजन केले. शहराच्या नयनरम्य सौंदर्यासोबत लोकांमध्ये कर्करोगाबाबत दीर्घकालीन जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सामान्य लोकांना सामावून घेत त्यांना थोर कार्यामध्ये सहभाग घेण्याची संधी देण्याकरिता या भित्ती-चित्रकला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे’,’लवकर निदान झाल्यास कर्करोगावर उपचार करता येऊ शकतो’ असे जागरूकता संदेश कॅन्सर रिबन्सच्या रंगांचा वापर करत भिंतीवर रंगवण्यात आले होते. कृषी कार्यालय, कसबा बावडा भगवा चौक, मिलिटरी कॅम्प जवळ,कोल्हापूर येथे या उपक्रमामध्ये १०० हून अधिक लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
इंडस हेल्थ प्लसचे संयुक्त- व्यवस्थापकीय संचालक श्री. अमोल नाईकवडी या उपक्रमाची प्रशंसा करत म्हणाले,”कर्करोग हा गंभीर आजार आहे. या आजाराबाबत परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे, जे फक्त जागरूकता उपक्रम व शिक्षणाच्या माध्यमातून साध्य होऊ शकते. रस्त्यावरील भिंतींवर भित्ती-चित्रे काढण्याच्या या विचाराच्या माध्यमातून आम्ही असे एक व्यासपीठ निर्माण करू इच्छितो, जेथे समुदाय व आरोग्य या दोघांचेही जतन होऊ शकेल. आम्ही समाजाशी संलग्न होत वैयक्तिक पातळीवर माहितीचा प्रसार करण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहोत.”
जागतिक कर्करोग दिनानिमित्त इंडस हेल्थ प्लसने’रेन्बो ऑफ हॅप्पीनेस: ब्रिंग बॅक स्माइल्स’ या थीमअंतर्गत भित्ती-चित्रकला हा उपकम राबवला. कर्करोगामुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो आणि त्याची उत्पादकता देखील कमी होते. परिणामत: देशाची उत्पादकता कमी होते. ब्रिक्स इकॉनॉमिक्सच्या अलीकडील संशोधनामधून निदर्शनास आले की, भारतात दरवर्षी ७ लाख व्यक्तींना कर्करोग होतो आणि दरवर्षाला आणखी १० लाख नवीन केसेसचे निदान होते. तज्ञांच्या मते भारताने कर्करोगाचे लवकर निदान करण्यावर भर दिला पाहिजे. कर्करोगाचे सुरूवातीच्या टप्प्यामध्ये निदान झाले तर उपचार खर्च कमी होतो. तसेच वाचण्याचे प्रमाण अधिक असते. ही आकडेवारी पाहता इंडसला वाटते की, लोकांना कर्करोगाची लक्षणे व प्रतिबंधाबाबत माहिती असणे आवश्यक आहे. समाजातील सर्व विभागांपर्यंत पोहोचत प्रत्येकाला कर्करोग होण्यापूर्वीच त्याचा प्रतिबंध करण्यामध्ये सक्षम करण्याकरिता इंडसने अशा अनेक जागरूकता उपक्रमांचे आयोजन केले आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.