सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पस परिसरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगार आणि स्वयंरोजगार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते. या महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी दीडशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. युवक युवतींच्या पात्रतेनुसार या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे काम कंपन्यांकडून केले जात आहे या महारोजगार मेळाव्यासाठी दहा हजाराहून अधिक युवक युवतींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
या महारोजगार मेळाव्यासाठी आलेल्या तरुणाई सोबत बोलताना खासदार उदयनराजे यांनी आपल्या भाषणात माझं ह्रदय हे कायम तुमच्या प्रगतीसाठी धडधडत राहील. तुम्ही खूप मोठे व्हावे एवढी सदिच्छा व्यक्त करत जिल्ह्यातील तरुण तरुणींनी उंच शिखर गाठावे. यामुळे साताऱ्याच्या वैभवात मोठी भर पडेल अशी भावना यावेळी उदयनराजेंनी व्यक्त केली. तर दुसरीकडे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात आलेला तरुणांना नोकरी मिळाली नाही तर खचून न जाता उद्योगासाठी प्रयत्न करावेत असं मत व्यक्त केलं.
यावेळी विरोधक महाराष्ट्रातील असलेल्या प्रकल्पांवर करत असलेल्या टीकेचा देखील त्यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्री डावसला गेले असताना आम्ही १ लाख ३७ कोटींची MOU केली. त्यावेळी काही लोकांनी आमच्यावर शंका व्यक्त केली. विरोधकांनी आमच्यावर वेगवेगळ्या आरोप केले. फॉक्सकॉन कसा गेला, वेंदाता कसा गेला असा प्रश्न ते करतात. विरोधकांना आता काहीही उद्योग राहिलेला नाही. त्यांना पत्रकार परिषद घ्यायचा उद्योग राहिला असल्याची टीका यावेळी संजय राऊत यांचे नाव न घेता उदय सामंत यांनी केलीये.