डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला तेरा तास ताटकळत ठेवत रात्रीच्या वेळी शासकीय रूग्णालयात पाठविले. मात्र रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच मातेच्या गर्भात अर्भकाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. यामुळे संतप्त नातेवाईकांनी आज महापालिकेच्या प्रसूतिगृहावर धडक मारून आक्रोश केला. तर उपमहापौर धीरज सुर्यवंशी, नगरसेवक आनंदा देवमाने, गणेश माळी, अमर निंबाळकर यांनी आरोग्याधिकाऱ्यांना धारेवर धरत सुविधा देता येत नसतील तर प्रसूतिगृहाला कुलूप लावण्याचा पवित्रा घेतला. दरम्यान, उपायुक्त स्मृती पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसात दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली. 

आशा सोमनाथ कोरडे यांचे सासर मायणी आहे. आठ वर्षानंतर त्या गर्भवती राहिल्या होत्या. प्रसूतीसाठी त्या माहेरी जामवाडीत आल्या होत्या. बुधवारी सकाळी सात वाजता त्यांना प्रसुतीपूर्व वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी त्यांना महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची साडेदहा वाजता तपासणी केली. मात्र नंतरच्या काळात त्याच्याकडे डॉक्टर फिरकले नाहीत. रात्री नऊ वाजता सिझेरियनची सोय नसल्याने रूग्णालयातील परिचारिकेने वसंतदादा शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. कोरडे यांच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या रूग्णवाहिकीची मागणी केली. मात्र महापालिकेची रूग्णवाहिका बंद पडली असल्याने रिक्षाने जावा, असा सल्ला दिला.
नातेवाईकांनी रात्रीच्यावेळी रिक्षाची शोधाशोध करत कोरडे यांना पंधरा मिनिटात शासकीय रूग्णालयात दाखल केले. शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांनी कोरडे यांची तपासणी केली. सोनोग्राफीमध्ये अर्भकाच्या ह्रदयाचे ठोके मिळत नव्हते. त्यामुळे तातडीने वरिष्ठ डॉक्टरांनी कोरडे यांची तपासणी केली. यावेळी मातेच्या गर्भातच अर्भकाचा मृत्यू झाला असल्याचे आढळून आले. महापालिका डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अर्भकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कोरडे यांच्या नातेवाईकांनी केला. आज कोरडे यांच्या भावाने हा सर्व प्रकार उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांच्या कानावर घातला. उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांचा पारा चढला. त्यांच्यासह नगरसेवक आनंदा देवमाने, अमर निंबाळकर यांच्यासह नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रसुतिगृहावर धडक मारून वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.