कराड | देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान पत्करलं होत. तो लढा इंग्रज, परदेशीयांविरोधात लढा होता. मात्र, देशातील जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतानाही इंग्रजापेक्षा अमानुष प्रकार करण्याची प्रवृत्ती वाढली आहे, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला.
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासून या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे असल्याची माहिती सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना दिली.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या वर्षभर उत्तर भारतात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. काहींना अटक करण्याचा प्रयत्न केला. लखीमपूर येथील आंदोलनातील शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाने केला. दुर्दैवाने त्यात शेतकरी मृत्युमुखी पडले. पण, त्या संशयितांना तत्काळ अटकही झाली नाही. हे आंदोलन दडपण्याचा भयानक प्रयत्न त्यांनी केला.
देशातील शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका बंद मागे आहे. लखीमपूरची ही अमानवी घटना घडली आहे, त्याच्या निषेधार्थ हा बंद यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे. आपण सायंकाळपपर्यंत हा बंद पाळावा, ही विनंती, असंही त्यांनी आवाहन केलंय.