क्रूरतेचा कळस ! जन्मदात्या बापानेच केला मुलाचा अमानवीय छळ

0
63
crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आईचे निधन झाल्यानंतर बापानं दुसऱ्या महिलेशी लग्न केले. पण लेकरात त्याचं काळीज कधी विरघळलंच नाही. असा क्रूर बाप आणि सावत्र आईनं बारा वर्षाच्या बालकावर अगणित अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला. या मुलाला घरकाम करायला लावण्यापासून ते लाटणे, कुकरचे झाकण, इतर भांडी अशा हाताला येईल त्या गोष्टींनी बेदम मारहाण केली. काड्याची पेटीची काडी, मेणबत्तीने ठिकठिकाणी चटकेही दिले. मोठ्या भावाच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पोलिसांमध्ये या पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी बारा वर्षीय मुलाच्या 21 वर्षीय मोठ्या भावाने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, 2015 मध्ये निधन झाले. 2016 मध्ये त्याच्या वडिलांनी नुसरत खान नामक महिलेसोबत दुसरे लग्न केले. दोघेही भाऊ त्यांच्यासोबत राहत होते. मात्र क्षुल्लक कारणामुळे वडील आणि सावत्र आई सतत शिवीगाळ करु लागल्याने या मोठ्या भावाने सहा महिन्यांपूर्वीच घर सोडले. तो आरेफ कॉलनीतील आजोबांकडे राहू लागला. मोठा भाऊ निघून गेल्यानंतर लहान भाऊ वडीलांकडेच रहात होता. मात्र या सावत्र आई आणि वडिलांनी लहान मुलावर अगणित अत्याचार करायला सुरुवात केली. लाटणे, कुकुरचे झाकण, लाकूड हाताला येतील त्या भांड्यांनी त्याला मारहाण झाली. काडेपेटीची काडी, मेणबत्तीचे चटकेही दिले. सगळे घरकाम करायला लावू लागले.

इतक्यावरच न थांबता 27 डिसेंबर रोजी तर सावत्र आई नुससरतने मुलाच्या तोंडावर बुक्का मारून दात पाडून जखमी केले. त्याचे भिंतीवर डोके आपटले. यामुळे त्याला चक्कर येऊ लागली. 28 डिसेंबर रोजी सकाळी मोठा भाऊ लहान भावाला भेटण्यासाठी गेला तेव्हा तोंडाला मार लागलेला पाहून त्याने चौकशी केली. त्यानंतर लहान भावाने सगळा प्रकार सांगितला. भावाने त्याला तत्काळ आजोबांकडे नेले. वडिलांनी विरोध केला, मात्र मोठ्या भावाने तो जुमानला नाही. या सर्व प्रकाराविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here