प्रेरणादायी : नाम फाउंडेशनकडून तीन तालुक्यात 700 पूरग्रस्त कुटुबांना 5 हजार पत्र्याचे वाटप

अभिनेते मकरंद अनासपुरे व इंद्रजित देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोकणासह सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती गंभीर होती. कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रात हीच परिस्थिती होती. तीन तालुक्यात नाम फाउंडेशनकडून 700 कुटुबांना 5 हजार पत्र्याचे वाटप करण्यात येत आहे. पूरस्थिती झालेल्या हानीतून उभे राहण्यासाठी ही मदत करण्याचे कारण म्हणजे त्यांना उभारी मिळावी हे कारण आहे. पूरस्थिती असलेल्या भागात नाम फाउंडेशनने काम केले. चिपळूण, पाटण व पोलादपूर येथे दरडी हटविणे, रस्ते तयार करून 29 गावात संपर्क साधणे सुरू केली असल्याचे नाम फाउंडेशनचे व अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.

कराड तालुक्यातील वाठार येथे नाम फाउंडेशन यांच्याकडून कराड, शिराळा व पाटण या तीन तालुक्यात 5 हजार पत्र्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, कृष्णा सहकारी साखर कारखान्यांचे संचालक दत्तात्रय देसाई यांच्यासह पूरग्रस्त व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

इंद्रजित देशमुख म्हणाले, संकटे ही आपण निर्माण करतो. तेव्हा समाजातील प्रत्येकाने निसर्गावर प्रेम केले पाहिजे. निसर्गाने जीवनात आपण अतिरेक केला, नको त्या प्रमाणात झाडे तोडली. विकास करण्याच्या नावावर अतिक्रमण केले. यापुढील काळात निसर्गावर प्रेम करा. नाम फाउंडेशन नेहमीच लोकांच्या दुःखात पुढाकार घेत असते. यावर्षी झालेल्या पाऊस व पूराच्या दुर्घटनेत अनेक सामाजिक कामे नाम फाउंडेशनने केलेली आहे.