सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
प्राणी कल्याण संस्था अॅनिमल राहतने पंधरा वर्षाच्या काळात एक लाखांहून अधिक प्राण्यांना वैद्यकीय सेवा दिली असून १४०० हून अधिक प्राण्यांचा बचाव व सुटका केली आहे. यासह अनेक शस्त्रक्रिया करून प्राण्यांना जीवनदान देऊन सामाजिक बांधिलकी जपली असल्याची माहिती अॅनिमल राहतचे डॉ. नरेश उपरेती व चेतन यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली. यापुढे सामाजिक कार्य असेच सुरू ठेवणार असून नागरिकांनी देखील सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
राहत टीमने संकटातील प्राण्यांना वाचवून त्यांचे जगणे सुखकर केले आहे. यापुढेही प्राण्यांचे होणारे हाल रोखुन प्राण्यांना यातना मुक्त करण्याचे काम सुरूच राहणार आहे. कुत्र्यांच्या गळ्यातील जीवघेणी साखळी, पट्टा, विहीरीत, खड्यात पडलेली प्राणी, गाळात रूतलेली म्हैस, डांबरात अडकलेले कुत्रे, रक्तबंबाळ अवस्थेत विहीरीत अडकलेला कोल्हा, २१ मिटर खाली पडलेली गाय अशा अनेक घटनांमध्ये शेकडो प्राण्यांना जीवदान दिले आहे. संस्थेच्यावतीने मुलांना कंपॅशनेट सिटिझन मनुष्य शिक्षण कार्यकमाअंतर्गत दयाळूपणाची शिकवण दिली जात आहे.
२०१४ पासुन या कामाची सुरवात केली जात असून आतापर्यंत १६ हजार विद्यार्थी, ८२५ शिक्षक, १५९ शाळेत ऍनिमल राहतमार्फत हा कार्यकम पोहचला आहे. संस्थेने बैल, कुत्रा, घोडा आदी प्राण्यांचे हाल कमी करण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. ऊस कारखान्यावर वापरण्यात येणारे बैल, घोडे, विट भट्टीवरील गाढव यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काम करून घेतली जातात पण काम झाले की मोकाट सोडतात अशांवर पोलिसांंनी कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत जावेळी मांडण्यात आले. मुक्या प्राण्यांऐवजी यांत्रिकी करणावर भर देत या जीवघेण्या कष्टातून अनेक बैलांची व घोडा, गाढव यांची सुटका केली. २५ ऊस कारखान्यांमधील ६१०० मिनी ट्रॅक्टर आणि ६३५ मोठे ट्रक्टर वापरण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे १७ हजार बैलांना भरमसाठ ओझे वाहण्यापासुन मुक्तता मिळाली असल्याचे डॉ. नरेश उपरेती यांनी सांगितले.