वाई | प्रशासनाने संस्थात्मक विलगिकरण करण्याच्या सूचना केल्यानुसार पाचवड ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांसाठी नुकतेच १२ बेडचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात या कक्षांची उभारणी करण्यात आलेली आहे. महिला व पुरुष असे विलगिकरनाचे दोन वेगळे कक्ष तयार करण्यात आले असून कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
ग्रामपंचायतीकडून याठिकाणी ३ ऑक्सिजन मशीन रुग्णांसाठी सुसज्ज ठेवण्यात आल्या असून पाचवड आरोग्य उपकेंद्राद्वारे येथे येणाऱ्या रुग्णांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी होणार आहे.
पाचवड ग्रामपंचायती बरोबरच महसूल विभाग व आरोग्य विभागाचे या विलगीकरण केंद्रावर नियंत्रण राहणार आहे. या विलगिकरण केंद्राचा फायदा पाचवड व अमृतवाडी गावांमधील कोरोना रुग्णांसाठी होणार आहे.
या संस्थात्मक विलगिकरण कक्षाच्या शुभारंभी वाईचे तहसीलदार रणजित भोसले, वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, पाचवडचे सर्कल सचिन जाधव, सरपंच अर्चना विसापुरे, उपसरपंच कमलाकर गायकवाड, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब चव्हाण, अमृतवाडीचे ग्रामसेवक गणेश भिसे, तलाठी संकेत साळुंखे, भुईंज आरोग्य केंद्राचे परिचारक सचिन सोनवणे, पाचवड आरोग्य उपकेंद्राच्या परिचारिका उपस्थित होते.