कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
एका वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेले वृत्त वाचून नगरध्यक्षांचे पती नगरसेवक कुमार शिंदे यांनी समाज माध्यमातुन अपशब्द वापरल्याबद्द्ल महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाने कुमार शिंदे यांचा निषेध केला असुन त्यांनी या प्रकार बाबत माफी मागावी, अशी मागणीही पत्रकार संघाने केली आहे. दरम्यान कुमार शिंदे हे माफी मागत नाही तो पर्यत महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाने त्यांच्या बरोबर असहकार पुकारण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीती पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित खुरासणे यांनी दिली.
रविवारी एका दैनिकात पालिकेच्या कारभारा बाबत वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. हे वृत्त पालिकेच्या कचरा विभागातील आर्थिक घोटाळयावर भाष्य करणारे होते. या हे वृत्त प्रसिध्द होताच शहरात एकच खळबळ माजली होती. सदरचे वृत्त वाचुन नगराध्यक्षां स्वप्नाली शिंदे यांचे नगरसेवक असलेले पती कुमार शिंदे यांचे चांगलेच पित्त खवळले. ते व्हॉटअप् ग्रुपचे ॲडमिन असलेल्या ग्रुप वरून पत्रकारांविषयी खालच्या पातळीवरून गरळ ओकली. या वेळी त्यांनी अपशब्द वापरून पत्रकारांचा अपमान केला. कुमार शिंदे यांच्या या कृतीने महाबळेश्वर येथील पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
येथील महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजित खुरासणे यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या सदस्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत कुमार शिंदे यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. कुमार शिंदे हे जो पर्यंत माफी मागत नाही, तो पर्यंत त्यांचे बरोबर असहकार्य करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला अध्यक्ष अभिजीत खुरासणे यांच्यासह उपाध्यक्ष अजित जाधव, सचिव सचिन शिर्के, खजिनदार प्रेषित गांधी, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य विलास काळे, अजीत कुंभारदरे आदी पत्रकार उपस्थित होते. त्याच प्रमाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष बबनराव ढेबे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय दस्तुरे यांनी देखिल दुरध्वनी वरून पत्रकार संघाच्या मागणीला दुजारा दिला आहे.
कुमार शिंदे यांनी पत्रकारांचा अपमान करून चूक केली आहे. महाबळेश्वर मराठी पत्रकार संघाने घेतलेल्या निर्णया बरोबर जिल्हा पत्रकार संघ आहे वेळ प्रसंगी कुमार शिंदे यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने आंदोलनात मी सर्वात पुढे असेल अशी प्रतिक्रिया जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी दिली.
नगराध्यांक्षाचा पती उंटा ऐवजी गाढवावर बसलेला शेख
जिल्हा पत्रकार संघाचे सचिव दिपक प्रभावळकर यांनी देखिल या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. पत्रकारांशी बोलताना प्रभावळकर म्हणाले, की महाबळेश्वरच्या नगराध्यक्षांचा पती उंटा ऐवजी गाढवावर बसलेला शेख आहे. या शेखचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. त्यांनी महाबळेश्वरच्याच नव्हे तर जिल्हा पत्रकार संघाची माफी मागावी अन्यथा जिल्हा पत्रकार संघ अशा मग्रुर व्यक्तीचा समाचार घेण्यास सक्षम आहे.