सातारा | रविवारी रात्री साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांची बदनामी केल्यामुळे दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका गटाने विशिष्ट समुदायाला लक्ष करत दगडफेक, जाळपोळ, प्रार्थना स्थळावर हल्ला केला. यामध्ये एका युवकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दगडफेक, जाळपोळीमुळे गावकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संबंधित परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर या घटनेचे आणखीन पडसाद उमटू नये यासाठी पुसेसावळी गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नेमक प्रकरण काय?
पुसेसावळी गावात सोशल मीडियावर महापुरुषांविरोधात वादग्रस्त पोस्ट टाकण्यात आली होती. त्यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला. शेवटी हा वाद इतका टोकाला पेटला की, रविवारी रात्री पुसेसावळी गावात दंगलीचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटात झालेल्या वादात दगडफेक, जाळपोळ, प्रार्थना स्थळावर हल्ला अशा गोष्टी करण्यात आल्या. 500 पेक्षा जास्त असलेल्या जमावाने गावात राडा घातला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणामुळेच आज पुसेसावळी येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. तसेच गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इंटरनेट सेवा बंद
याप्रकरणी आता प्रशासनाकडून पुसेसावळी गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गावातील परिस्थिती पूर्वरत होईपर्यंत ही इंटरनेट सेवा बंद राहू शकते. सध्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, गावाच्या मुख्य चौकात अग्निशामक दलाची गाडी देखील ठेवण्यात आली आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यासोबत गावातील इतर व्यवहार देखील बंद ठेवण्यात आले आहेत.