सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
आंतरजतीय विवाह केला म्हणून एकाच कुटुंबातील चौघांना पांचगणी येथे बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या कुटुंबाने न्यायासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. सात दिवसांपूर्वी झालेल्या घटनेची तक्रार अखेर आज या कुटुंबीयांनी पांचगणी पोलीस ठाण्यात दाखल केली. स्नेहा उर्फ रिता चेतन कांबळे (वय- 22, रा.आंबेडकर कॉलनी, पाचगणी) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, स्नेहा उर्फ रिता चेतन कांबळे दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हंटले आहे की, माझा भाऊ ऋत्विक रमेश कदम (रा. सिद्धार्थनगर- पांचगणी) यांने काही दिवसापूर्वी ऐका सवर्ण मुलीशी आंतरजातीय प्रेम विवाह केला आहे. या कारणावरून 15 एप्रिल रोजी रात्री सिडनी पॉईट पांचगणी येथे मला व माझे पती चेतन चंद्रकांत कांबळे, दिर सुमित गुलाब कांबळे व भाऊ ऋत्विक रमेश कदम यांना अर्जुन जेधे, सौरभ गायकवाड, ऋषिकेश कांबळे, हिमांशु मोरे, हर्षराज दिवार, अशोक सणस व इतर मुलांनी बांबु, रॉड, हॉकी स्टिक याने बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सकाळी सात वाजता अशोक सणस याने घरी येऊन शिवीगाळ करून जीवे मारणेची धमकी दिली म्हणुन त्यांचेविरुध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत पांचगणी पोलिसांनी संबंधितांचा जबाब नोंदवून घेतला असून सदर संशयितांवर भादवीस कलम १४३, १४७, १४८, ३५४ व ५०६ प्रमाणे मारहाण, जिवे मारण्याची धमकी अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यशवंत महामुलकर व त्यांचे सहकारी करीत आहेत.