सातारा: येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील इंग्रजी विभागाच्या रिडर्स क्लबमार्फत २ सप्टेंबर २०२२ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त “वि.स. खांडेकरांच्या साहित्याचे अभिवाचन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी. जाधव यांनी वि.स.खांडेकर यांच्या साहित्यातून समाजाप्रती असलेली त्यांची जाणीव, कणव, अन्याय अत्याचारविरोधात त्यांनी उठवलेला आवाज जाणवतो हे विशद करताना त्यांच्या लेखनात माणुसकीचा गहिवर उमटून असलेला दिसतो आणि हे आजच्या तरुण पिढीला माहिती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पारिजातक मासिकाच्या संपादक आणि बॉटनी च्या प्रा. रोहिणी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाचन आणि लेखन करण्यास प्रोत्साहित केले. प्रस्ताविकामध्ये इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ मनिषा आनंद पाटील यांनी रिडर्स क्लब चा उद्देश आणि वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबद्दल व उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यानंतर अभिवाचनाचा कार्यक्रम सुरू झाला ज्यात रिडर्स क्लब च्या सदस्यांनी अभिवचन सादर केले. सुरुवातीला संकल्प आंबराळे याने वि.स. खांडेकर यांचा जीवनप्रवास, तर मोसीन मोमीन ह्याने त्यांचा साहित्यप्रवास प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवला.
ह्यानंतर वि.स. खांडेकरांच्या विविध साहित्यकृतींचे अभिवाचन करून रिडर्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी त्यांना आदरांजली व्यक्त केली. भाग्यश्री खंडाईत हिने “भग्न स्वप्नांच्या” तर अर्पिता जगदाळे हिने “किती मोहक मूर्ती ती” ह्या परिच्छेदांचे अभिवाचन केले. श्रद्धा निपाणे हिने “रणी फडकती लाखो झेंडे”, श्रद्धा करंडे हिने “उभवू उंच निशाण”, तर मनिषा कोळेकर हिने “रम्य अशा स्थानी” ह्या कवितांचे अभिवाचन केले. मृणाल काटकर हिने सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन सई घोगरे हिने केले. रिडर्स क्लबचे समनव्यक प्रा. पार्थ यादव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी रिडर्स क्लबचे सर्व सदस्य व इंग्रजी विभागातील प्रा. सचिन लवटे, प्रा. विठ्ठल शिंदे, प्रा. अमृता शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विद्यार्थी सदस्यांनी केले होते. रिडर्स क्लब मार्फत अभिवचन कार्यक्रम, पुस्तक चर्चा यासारखे उपक्रम तसेच पुस्तक परीक्षण मार्गदर्शन तसेच वाचन कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.