कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कराड येथे 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेले राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आले.
सहकार विभागाचे जिल्हा निबंधक मनोहर माळी, उपनिबंधक तथा बाजार समितीचे प्रशासक संदीप जाधव यांनी हे निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. यावेळी बाजार समितीचे सचिव बी.डी.निंबाळकर, संदीप गिड्डे -पाटील उपस्थित होते.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षी कराड येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरविण्यात येते. कोरोनामुळे दोन वर्षे ते घेता आले नाही. यावर्षी भव्य स्वरूपात हे प्रदर्शन भरत आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याबाबत कराड बाजार समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त 25 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येत असतात. तेथून कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी जात असतात असा प्रघात आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या कराड दौर्याबाबत उत्सुकता आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृत कार्यक्रम घोषीत होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे यांनाही उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण देण्यात आले.
कृषी प्रदर्शनास होणारी गर्दी पाहता मुख्यमंत्री शिंदे यांनी शासकीय योजनांच्या विविध विभागांचे दालन उभा करण्यासंदर्भात महिती व जनसंपर्क महासंचालनालयास निर्देश दिले आहेत. बाजार समिती पणन विभागाअंतर्गत येत असल्याने आणि पणन विभाग सध्या मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच असल्याने महाराष्ट्र राज्य पणन मंडळाला प्रदर्शनामध्ये सक्रीय सहभाग घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. प्रशासनातील सर्व विभाग प्रदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. प्रदर्शनात 400 पेक्षा जास्त स्टॉलचा सहभाग असून नवनव्या संकल्पना घेऊन हे प्रदर्शन पार पडत आहे.