मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2021च्या उरलेल्या मोसमाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हे उर्वरित सामने युएईच्या दुबई, शारजाह आणि अबुधाबीमध्ये खेळवण्यात येणार आहे. 4 मे रोजी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. आता युएईमधल्या आयपीएलसाठी बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याच कारणामुळे आयपीएलच्या नियमातही बदल करण्यात आला आहे.
या नव्या नियमानुसार जर बॉल स्टॅण्डमध्ये गेला, तर तो बॉल पुन्हा खेळण्यासाठी वापरला जाणार नाही, त्याऐवजी दुसरा बॉल घेऊन मॅचला सुरुवात करण्यात येईल. कोरोना प्रोटोकॉलसाठी हा नियम करण्यात आला आहे. स्टॅण्डमध्ये गेलेल्या बॉलला सॅनिटाईज करून लायब्ररीमध्ये ठेवलं जाणार आहे. मागच्यावेळी आयपीएलदरम्यान स्टॅण्डमध्ये कोणीही सामना बघायला नव्हतं, त्यामुळे बॉल सॅनिटाईज करून पुन्हा वापरला जायचा. यावेळी युएईमध्ये मॅच बघण्यासाठी प्रेक्षक येऊ शकतात, या कारणामुळे बीसीसीआयने सुरक्षेसाठी हा नियम बनवला आहे.
आयपीएलशिवाय टी-20 वर्ल्ड कपसाठीही चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल, असं युएई बोर्डाने यगोदरच स्पष्ट केले आहे. यासाठी युएई क्रिकेट बोर्ड बीसीसीआय आणि आयसीसीसोबत चर्चा करत आहे. 17 ऑक्टोबरपासून युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. उर्वरित आयपीएल 19 सप्टेंबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. या 31 मॅचपैकी 13 मॅच दुबईमध्ये, 10 मॅच शारजाहमध्ये आणि 8 मॅच युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे मागच्या वर्षीची आयपीएलसुद्धा युएईमध्येच खेळवण्यात आली होती.