IPL 2022 : मेगा लिलावापूर्वी कोणत्या संघाने किती पैसे खर्च केले अन् किती शिल्लक आहेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आयपीएलच्या पुढील हंगामासाठीचा मेगा लिलाव 12-13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. यावेळी लीगमध्ये 10 संघ उतरतील. लिलावात सर्व 10 संघ खेळाडूंवर सट्टा लावतील. मात्र आता कोणत्या फ्रँचायझीकडे किती पैसे शिल्लक आहेत आणि किती खर्च झाला आहे ते जाणून घ्या. IPL-2022 च्या मेगा लिलावात एकूण 10 संघांबद्दल बोलायचे झाल्यास एकूण 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यामध्ये 370 भारतीय तर 220 परदेशी खेळाडू आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सकडे 48 कोटी शिल्लक आहेत आणि 42 कोटी रुपये खर्च झाले आहेत. कर्णधार रोहित शर्माला संघाने 16 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जकडे 48 कोटी शिल्लक आहेत आणि 42 कोटी खर्च केले आहेत. या फ्रँचायझीने रवींद्र जडेजाला 16 कोटी, धोनीला 12 कोटी, मोईन अलीला 8 आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटींमध्ये कायम ठेवले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे मेगा लिलावासाठी 57 कोटी रुपये शिल्लक आहेत. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना रिटेन करण्यासाठी त्याने 33 कोटी खर्च केले. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने 4 खेळाडूंना कायम ठेवले ज्यासाठी 42.5 कोटी रुपये खर्च झाले. दिल्ली फ्रँचायझीकडे आता 47.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.

पंजाब फ्रँचायझीला पूर्णपणे नवीन संघ तयार करायचा आहे आणि हे लक्षात घेऊन केवळ 2 खेळाडूंनाच कायम ठेवण्यात आले आहे. मयंक अग्रवालला 12 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता 72 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. दोन वेळचा चॅम्पियन असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. त्याशिवाय व्यंकटेश अय्यर आणि वरुण चक्रवर्ती यांना 8-8 कोटींमध्ये तर सुनील नरेनला 6 कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. या संघाकडे आता 48 कोटी रुपये शिल्लक आहेत.

माजी चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादने केन विल्यमसनला 14 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. अब्दुल समद आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे आणि आता या फ्रँचायझीकडे आता 68 कोटी रुपये शिल्लक आहेत. राजस्थान रॉयल्सने 4 खेळाडूंना कायम ठेवले ज्यासाठी 28 कोटी रुपये खर्च करण्यात आले. राजस्थान फ्रँचायझीकडे आता 62 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यांच्याकडून संजू सॅमसनला 14 कोटी रुपयांना तर जॉस बटलरला 10 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे.

IPL-2022 मध्ये पहिल्यांदाच उतरणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सकडे 59 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यांनी केएल राहुलला 17 कोटींना, मार्कस स्टॉइनिसला 9.2 कोटींना आणि फिरकीपटू रवी बिश्नोईला 4 कोटींना खरेदी केले आहे. गुजरात टायटन्स, हा आयपीएलच्या पुढच्या हंगामात सामील होणारा दुसरा संघ आहे. त्यांच्याकडे अद्याप 52 कोटी शिल्लक आहेत. या संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्या सांभाळणार आहे, जो यापूर्वी मुंबई इंडियन्सशी संबंधित होता.

Leave a Comment