आजपासून आयपीएल सुरू; पहिला सामना चेन्नई आणि कोलकात्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल ला आजपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएल चा पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर हा सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. चेन्नई संघाने चार वेळा लीग ट्रॉफी जिंकली आहे. दुसरीकडे, कोलकाताने दोन वेळचा आयपीएल विजेता आहे.

लीगमधील हेड टू हेड बद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 26 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये सीएसकेने 17 विजय मिळवले आहेत. तर कोलकाताने 8 सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. याचाच अर्थ कोलकात्याविरुद्ध चेन्नईचा वरचष्मा आहे. गेल्या मोसमात दोन्ही संघांमध्ये तीन सामने झाले होते. ज्यामध्ये चेन्नईने बाजी मारली होती.

दरम्यान, आजच्या सामन्यात दोन्ही संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरतील. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर रवींद्र जडेजाकडे चेन्नईचे कर्णधारपद मिळाले. हा सामनाही त्याचे आयपीएलमधील कर्णधारपदाचे पदार्पण असेल. त्याचबरोबर केकेआरची कमान श्रेयस अय्यरच्या हाती आहे. गेल्या मोसमापर्यंत तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. मात्र, रोहित शर्मानंतर अय्यर हा या आयपीएल चा दुसरा सर्वात अनुभवी कर्णधार आहे. 2018 ते 2020 पर्यंत तो दिल्लीचा कर्णधार होता.