इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्थांच्या मदतीला धावला ‘लालबागचा राजा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । विशाखा महाडिक
गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने प्रचंड जोर धरल्याचे दिसून आले आहे. बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याजवळील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाले आणि या दुर्घटनेत गावातील २५ ते ३५ घरे माती, दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अजूनही १०० ते १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

सध्या या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सतत पाऊस आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. दरम्यान इर्शाळवाडी आपत्ती ग्रस्थांच्या मदतीला मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धावले आहे. जीवनावश्यक पदार्थ, वस्तू, महिला – पुरुष – लहान मुलांसाठी कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ, अन्नपदार्थ तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासन कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक पदार्थ अन वस्तूंची मदत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पाठवण्यात आली आहे.

https://www.facebook.com/LalbaugchaRaja/videos/794818922106988

इर्शाळवाडीवर भूस्खलनामुळे मोठी जीवीत हानी झाली असून अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेत जखमी आणि वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते शुक्रवारी, २१ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता मदत घेऊन लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून २ मोठे टेम्पो इर्शाळवाडीकडे रवाना झाले.