औरंगाबाद (नवनीत तापडिया) | महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेले औरंगाबाद शहर अनेक ऐतिहासिक स्थळांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या दीड वर्षांपासून शहराची ही ओळख कुठेतरी कमी होत चालली आहे. याला कारण आहे ते म्हणजे शहरातील वाढती गुन्हेगारी. औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांची हिंमत वाढतच चालली आहे. त्याला कारणही तसेच आहे, ते म्हणजे पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला धाक आता कमी होताना दिसत आहे. औरंगाबाद शहरात दिवसागणिक वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे मात्र नागरिकांना आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलीस प्रशासन मात्र ‘ऑल इज वेल’ असल्यासारखे वागत आहेत.
आशिया खंडात सर्वात झपाट्याने वाढलेले शहर म्हणून औरंगाबादची ओळख असलेल्या शहरात आता मात्र गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात अनेकजण खुलेआम नंग्या तलवारी घेऊन फिरत आहेत. शहरात वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याची तर जणू प्रथाच झाल्यासारखे वाटत आहे. दिवसाढवळ्या शहरात सार्वजनिक ठिकाणी मारहाण होणे तर आता नित्याचेच झाले आहे. मागील दीड वर्षात बहुतांश वेळी रात्री कोरोनाची संचारबंदी असताना शहरात अनेक खून झालेले आहेत. जर संचारबंदी असताना मध्यरात्री खुलेआम भररस्त्यात खून होत असतील तर तिला संचारबंदी म्हणावे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संचारबंदीत पोलिसांचा फौजफाटा मोठया प्रमाणावर रस्त्यावर होता. तरी देखील पोलिसांच्या नाकावर टिच्चून खून झाल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारांना आता खाकीचा धाक उरला नाही असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. तसेच महिला आपल्या जीवापेक्ष मौल्यवान असणाऱ्या मंगळसूत्र चोरीच्या घटना शहरात भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी घडत आहेत. यामुळे महिलांना निश्चित बाहेर फिरणे अवघड झाले आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ४ तारखेला पोलीस आयुक्ताचा पदभार स्वीकारल्यावर गुंडाराज नही चलेगा अशी घोषणा निखिल गुप्ता यांनी केली होती. त्यांच्या घोषणेला अनुसरून त्यांनी काम करण्यास सुरुवात देखील केली होती. त्यानुसार त्यांनी विशेष पथकाची स्थापना करून अनेक गुन्हेगांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सिपींच्या या विशेष पथकाचा दरारा मोठ्या प्रमाणावर वाढला होता. परंतु नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे सिपींचे विशेष पथक देखील नंतर थंड पडले आणि शहरात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. कालांतराने कोरोनच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली लॉकडाऊन लागले व पुन्हा एकदा लॉकडाऊन आणि बंदोबस्ताचे कारण पोलिसांना पुढे करण्याची संधी मिळाली आणि यादरम्यानच्या काळात औरंगाबाद शहराची गुन्हेगारी सातव्या आसमानवर पोहोचली असे म्हणले तर त्यात काहीच वावगे ठरणार नाही.
पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत मागील १९ महिन्यात १९ मर्डर –
औरंगाबाद तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १ जानेवारी २०२० ते १० ऑगस्ट २०२१ या १९ महिन्यांच्या काळात तब्बल १९ खुनाचे गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. म्हणजे औरंगाबाद शहर व परिसरात सरासरी महिन्याला एक खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक असली तरी वास्तविक परिस्थिती पासून आपल्याला लांब पळता येणार नाही. जर शहरात महिन्याला सरासरी एक खून होत असेल तर शहरात कायदा व सुव्यवस्था खर्च अबाधित आहे का ? हा संशोधनाचा विषय आहे.
मागील अडीच महिन्यातील खुनाच्या घटना –
* एमआयडीसी वाळूज – २१ मे रोजी सराईत गुन्हेगार विशाल फाटे (२६) याचा भर रस्त्यात डोक्यात दगड घालून खून
* छावणी – छावणीत २८ मे रोजी कुख्यात गुन्हेगार शेख माजिद शेख अली याचा चाकूने भोसकून खून
* सिटी चौक – या परिसरात ४ जूनच्या मध्यरात्री रेकॉर्ड वरील आरोपी जमीर खान उर्फ जम्या खान याचा चाकूने भोसकून खून
* जिनसी पोलीस ठाणे – परिसरात २३ जुलैला कुख्यात आरोपी शेख अरबाज उर्फ विशाल (२४) याचा देखील चाकूने भोसकून खून करण्यात आला होता.
* पुंडलिक नगर – या परिसरात नेहमीच खुनाच्या घटना घडत असतात. ९ ऑगस्ट रोजी कुख्यात आरोपी गणेश तनपुरे, ऋषिकेश तनपुरे व यांच्या साथीदारांनी हत्या केली होती. मागील अडीच महिन्यात लॉकडाऊन, संचारबंदी लागू असताना देखील शहरात तब्बल ५ मर्डर झाले आहेत. यावरून पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला वचक कमी झाला असे स्पष्ट होत आहे.
घरफोडी, वाहनचोरी तर नित्याचेच –
औरंगाबाद तसेच परिसरात गेल्या १९ महिन्यात म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून १० ऑगस्ट २०२१ पर्यंत घरफोडीच्या तब्बल ५२ घटना घडल्या असल्याची माहिती समोर येत आहे. या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याव्यतिरिक्त शहरात व परिसरात वाहनचोरीच्या घटनांनी कळस गाठला असून मागील १९ महिन्यात तब्बल २१८ वाहनचोरीचे गुन्हे औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच मंगळसूत्र चोरीचे देखील १८ गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यामुळे घरफोडी, वाहनचोरी हे नित्याचेच झाले आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.