हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसची राज्यातील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. राज्यातील सर्वच कारागृहात ही खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कारागृहात शिक्षा भोगणार्या परदेशी तसेच नवीन दाखल झालेल्या कैद्यांच्या आरोग्याचीखबरदारी घेण्यात येत आहे. या कैद्यांसाठी कारागृहात स्वतंत्र बराक निर्माण करण्यात आले आहेत.
वैद्यकीय पथकांमार्फत आठ-दहा दिवस निगराणी ठेवण्यात येणार आहे. येथील मध्यवर्ती कळंबा कारागृहातही 30 परदेशी, नवीन चाळीसवर कैद्यांची तत्काळ रवानगी स्वतंत्र बराकीत करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या संसर्गाची मध्यवर्ती व जिल्हा दर्जाच्या सर्व 65 कारागृहांतील वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा रक्षक व कारावास भोगणार्या 38 हजारांवर कैद्यांना बाधा होऊ नये, याची गृह खात्याने खबरदारी घेतली आहे. कारागृह अधीक्षक, तुरुंग अधिकार्यांना याबाबत सक्त सूचना देऊन तातडीच्या उपाययोजनांचे आदेशही देण्यात आले आहेत.
कोरोनाची लागण झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. 16) पासून न्यायालयीन कोर्ट पेशीसाठी जाणार्या कैद्यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर न करता व्हीसीद्वारे न्यायालयात हजर करण्याबाबतही राज्यातील सर्वच पोलिस अधीक्षक, कारागृह अधीक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत.