Thursday, March 23, 2023

कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप सामना रंगणार

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. यामध्ये अनेकजणांनी अर्ज दाखल करून निवडणुक रिंगणात उडी घेतली आहे. कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरूध्द भाजप तर उत्तरेत राष्ट्रवादी विरूध्द भाजप अशी लढत अनेक ठिकाणी होणार आहे. तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे आता गाव पातळीवर चावडीवरील राजकारण चांगलेच तापू लागले आहे.

कराड तालुक्यातील 44 ग्रामपंचायत निवडणूकीत आता चांगलीच रंगत आली आहे. तालुक्यात दोन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. कराड दक्षिणेत काॅंग्रेस विरोधात भाजप अशी लढत होणार आहे. काॅंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचे गट एकत्रित लढतील तेथे दुरंगी लढत होईल. परंतु या गटात ज्या गावात एकवाक्यता आढळणार नाही, तेथे स्थानिक पातळीवरील गटा- तटामुळे दुरंगी, तिरंगी लढतीची शक्यता आहे. दक्षिणेत भाजपकडून डाॅ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीत पॅनेल असणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाची भूमिका काही ठिकाणी भाजपसोबत तर काही ठिकाणी काॅंग्रेस सोबतची असणार आहे. परंतु राष्ट्रवादी पक्षाकडून स्वतंत्र पॅनेल उभी करण्याची शक्यता फार कमी आहे. कारण कराड दक्षिणेत राष्ट्रवादी पक्षाला कृष्णा कारखान्याचे चेअरमन अविनाश मोहिते हे सोडल्यास तगडा नेता कोणीही नाही. परंतु त्यांनाही अनेक राष्ट्रवादीच्या नेत्याकडून म्हणावे तसे स्थान दिले जात नाही.

- Advertisement -

कराड उत्तरेत राष्ट्रवादी व भाजप लढत होणार आहे. याठिकाणी माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांना शह देण्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुध्ये किती यश मिळेल, हे निकालानंतरच कळेल. त्यासोबत भाजपमधील दोन गट एकत्रित येण्यावर बरीच गणित अवलंबून आहेत. भाजपाचे मनोज घोरपडे हे पूर्वीपासून नेतृत्व आहे. तर नव्याने पक्षात आलेले धैर्यशील कदम यांच्या येण्याने पक्षाची ताकद वाढली आहे, असे म्हणावे लागेल. परंतु दोन्ही नेत्यांच्यातील मतभेद राहिल्यास राष्ट्रवादीला फायदा होईल, हे निश्चित आहे. आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून ही या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सध्या कराड उत्तरेत पाहिले जात आहे. सध्याची ग्रामपंचायत निवडणूक ही आगामी काळात कोणाला आमदारकी मिळेल, यांची व्यूहरचना बांधणारी ठरणार आहे.

कराड दक्षिणेतील भाजपाच्या निर्णय काय ?
जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांना भाजपाचे डाॅ. अतुल भोसले यांनी मदत केली होती. त्यानंतर बाजार समितीतही राष्ट्रवादी आणि भाजप असे समीकरण बांधण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशावेळी उत्तरेत भाजप पक्ष राष्ट्रवादी विरोधात असणार आहे. अशावेळी भाजप पर्यायाने डाॅ. अतुल भोसले यांची काय भूमिका राहणार यावर बरेच अवलंबून असणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे डाॅ. अतुल भोसले हे भाजपला उत्तरेत मदत करणार की विरोधात असणार, यावर बाजार समिती, नगरपरिषद आणि विधानसभेचे गणित असणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकात आ. बाळासाहेब पाटील आणि डाॅ. अतुल भोसले यांच्या भूमिकेकडे राजकीय जाणकरांचे लक्ष लागून राहणार आहे.