हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू परंपरेमध्ये दसरा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी आपण रावणाचे दहन करून वाईट शक्तींचा पराभव करतो. परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात याचं रावणाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच याठिकाणी रावणाला देवता समान पुजले जाते. ही प्रथा गेल्या अनेक काळापासून गावात चालत आलेली आहे. आज आपण याचं प्रथेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
आपल्याकडे रावणाला एक दुष्ट , क्रूर व्यक्ती समजले जाते. परंतु सांगोळा गावात याच रावणाला देवता म्हणून पुजण्यात येते. या गावात 350 वर्षांपुर्वीची रावणाची सुंदर आणि सुरेख मूर्ती आहे. तसेच, रावणासाठी सुंदर असे एक मंदिर देखील बांधण्यात आले आहे. या मंदिरात असलेल्या रावणाची गावकरी दररोज पूजा आर्चा करतात. तसेच, दसऱ्याच्या दिवशी रावणाला नैवेद्य दाखवतात. आपण जसे, इतर हिंदू देवतांना मानतो तसेच सांगोळा गावात रावणाला मानले जाते.
रावण हा शूरवीर राजा होता…
सांगोळा गावातील गावकऱ्यांची अशी मान्यता आहे की, रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता. त्याने कधीही देवी सीतेकडे वाईट नजरेने पाहिले नाही. तो लंकेचा एक शूरवीर राजा होता. तो एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती होता. त्यामुळे आपण रावणातील चांगुलपणाला पुजत राहिला हवा. यासाठी गावकरी दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करू नका, असे आवाहन सर्वांना करतात. तसेच, तुम्ही रावणाला पुजले नाही तरी चालेल परंतू त्याची अशा पद्धतीने विटंबना करू नका, असे देखील सांगतात.
पौराणिक कथा…
सांगोळा गावात जी रावणाची मूर्ती आहे त्यामागे एक लोकप्रसिद्ध पौराणिक कथा ही आहे. ही कथा अशी आहे की, गावाच्या कडेने वाहणाऱ्या मन नदीच्या काठावर ऋषीमुनींचे आश्रम होते. गेल्या अनेक वर्षांपूर्वी गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात एका ऋषीने तपस्या केली होती. परंतु काही काळानंतर या ऋषींचे निधन झाले. त्यामुळे या ऋषींच्या स्मरणार्थ एक मूर्ती साकारण्यात यावी असे गावकऱ्यांनी ठरवले. ही मूर्ती बनवण्याचे काम एका आशिल्पकाराला देण्यात आले होते. परंतु या शिल्पकाराने ऋषींच्या ऐवजी रावणाची मूर्ती बनवली. गावकऱ्यांनी या घटनेला एक मोठा योगायोग मानला. तेव्हापासून ते आजवर गावकरी या मूर्तीची पुजा करतात.
गेल्या काही वर्षांपूर्वी या मूर्तीला चोरण्याचा प्रयत्न देखील काही चोरांनी केला होता. मात्र त्यांचा हा प्रयत्न जागीच फसला. खरे तर या गावांमध्ये इतर देव देवतांची देखील मंदिरे आहेत. परंतु तरीदेखील गावकरी सर्वात जास्त रावणाला मानतात. दरवर्षी गावामध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणाची विशेष अशी पुजा केली जाते. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी लोक खूप लांबून येत जातात..