नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकने देशभरातून 15 मे ते 15 जून दरम्यान 10 उल्लंघन श्रेणींच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण 3 कोटींपेक्षाही अधिक पोस्ट हटवल्या आहेत. फेसबुकने आयटी नियमांअंतर्गत पहिला मासिक अनुपालन अहवाल सादर केला, त्या अंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. फेसबुकचा मालकी हक्क असणाऱ्या इन्स्टाग्रामने देखील याच कालावधीदरम्यान एकूण 9 श्रेणींअंतर्गत जवळपास 2 मिलियन पोस्टवर हि कारवाई केली आहे. या आयटी नियमांअंतर्गत 50 लाखांहून अधिक युजर असणाऱ्या सर्वात मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना आता दर महिन्याला कम्प्लायन्स रिपोर्ट प्रदर्शित करावा लागणार आहे. या रिपोर्टमध्ये त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींचा आणि त्यावर घेण्यात आलेल्या अॅक्शनचा उल्लेख करावा लागणार आहे.
15 जुलैला येणार अंतिम अहवाल
हा अहवाल 15 जुलै रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे अशी माहिती फेसबुककडून देण्यात आली आहे. या अहवालामध्ये प्राप्त तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईचा उल्लेख असणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला फेसबुकने असे सांगितले कि,2 जुलै रोजी त्यांच्याकडून अंतरिम अहवाल सादर केला जाणार आहे. ज्यामध्ये त्यांच्याकडून हटवण्यात आलेल्या कंटेटच्या संख्येबाबत तपशील देण्यात येणार आहे. याचा अंतिम अहवाल 15 जुलै रोजी सादर करण्यात येणार आहे.
फेसबुककडून हटवण्यात आला ‘हा’ कंटेट
15 जुलैच्या अहवालात व्हॉट्सअॅपशी संबंधित डेटा देखील समाविष्ट असणार आहे. ह्या अॅपवर देखील फेसबुकचा मालकी हक्क असणार आहे. अन्य प्रमुख प्लॅटफॉर्म ज्यांनी रिपोर्ट सादर केला आहे त्यामध्ये Google चा समावेश आहे. फेसबुकने त्यांच्या अहवालात असे म्हंटले आहे कि,15 मे ते 15 जून या दरम्यान 10 श्रेणींमधून 30 मिलियनपेक्षा अधिक कंटेटवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये स्पॅम (25 मिलियन), हिंसक आणि ग्राफिक (2.5 मिलियन), प्रौढ नग्नता आणि लैंगिक गतिविधींशी संबंधित कंटेटचा समावेश आहे. या व्यतिरिक्त गुंडगिरी आणि उत्पीडन, आत्महत्या, धोकादायक संस्था आणि व्यक्ती, दहशतवादी प्रचार इ. श्रेणीमध्ये येणाऱ्या सामग्रींवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.