साहित्यिकांनीच यशवंतरावांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ दिले नाही : मधुकर भावे

0
78
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्राला मोठी साहित्य परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही एक साहित्यिक होते. त्यांनी कलावंत, साहित्यिकांसाठीही कल्याणकारी कार्य केले. ते ९ साहित्य संमेलनांचे उद्घाटक, तर ७ साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष होते. मात्र, साहित्यिकांनीच यशवंतरावांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ दिले नाही; अशी खंत व्यक्त करत मराठी साहित्यिकांनी सर्वव्यापी भूमिका स्विकारत आपले मीपण विसरावे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात शनिवारी 12 रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त दैनिक प्रीतिसंगमचे रौप्य महोत्सवी वर्ष व यशवंनगरी न्यूज नेटवर्कची द्विशतकी वाटचाल यानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. याप्रसंगी कराड व परिसरातील साहित्यिकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील, यशवंतनगरीचे संपादक विकास भोसले व मान्यवर उपस्थित होते.

मधुकर भावे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने महाराष्ट्रासह देशाला एक लोककल्याणकारी नेतृत्व मिळाले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णकलश आणल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून अनेक विधायक कामे केली. पंचायतराज व्यवस्था, ग्रामीण भागामध्ये एमआयडीसीचे जाळे निर्माण करून
सर्वसामान्यांना लोकशाहीचा अधिकार व रोजगार मिळवून दिला. महाराष्ट्रात असे यशवंतराव चव्हाण पुन्हा होणे नाही. याची राज्यकर्त्यांनाही जाण असणे महत्त्वाचे आहे. शेतकरी का चिरडले गेले? कामगार का भरडले गेले? हे पाहण्यात आत्ताच्या राजकारण्यांना वेळ नाही. ते यशवंतरावांनी केले. महाराष्ट्राने आतापर्यंत यशवंतरावांच्या विचारांचे बोट धरले होते. ते सोडल्याने महाराष्ट्र भरकटला आहे. मात्र, कराडकरांनी यशवंतरावांच्या विचारांचा नंदादीप तेवत ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले,यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्यांसाठी न्यायिक भूमिका घेतली. अनेक निर्णयांमधून त्यांनी लोकांचा भाग्योदय केला. हेच विचार जोपासण्याची आज गरज आहे. मधुकर भावे यांनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीत मराठा वृत्तपत्रातून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात केली. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी यशवंत विचार जोपासला. तसेच सर्वसामान्यांना न्याय-हक्क मिळवून देण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यानुसार पत्रकारांनी सर्वसामान्यांप्रती आपली जबाबदारी ओळखून काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कराड परिसरातील साहित्यिकांचा सत्कार

याप्रसंगी कराड व परिसरातील साहित्यिक डॉ. शिवाजीराव ठोंबरे, विद्याधर गोखले, सी.डी.पवार, महादेव साने, बबन पोतदार, डॉ. मच्छिंद्र सकटे, अॅड.संभाजीराव मोहिते, डॉ. सुहासकुमार बोबडे, सुभाषराव गुरव, बसवेश्वर चेणगे, शंकर कवळे, संदिप डाकवे, सौ. अनघा दातार, सौ. शिल्पा चिटणीस, माणिक बनकर, अभय देशमुख, प्रा.दिलिपकुमार मोहिते डॉ. कोमल कुंदप यांचा यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात यशवंतनगरीचे संपादक विकास भोसले यांनी कराड ही यशवंतराव चव्हाण यांची साहित्य नागरी आहे. त्यामुळे आगामी काळात २५ नोव्हेंबर रोजी कराड येथे यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलन व्हावे. यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करावेत. तसेच त्यांचे साहित्य प्रकाशित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालक भरत कदम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here