सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. सोमनिया सारखी अवस्था आपल्या देशाची व्हायला फार काळ लागणार नाही. सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून या देशाचे तुकडे व्हायला देखील वेळ लागणार नाही, असा गर्भित इशारा राजकारण्यांना भाजपचे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
सातारा जिल्हा परिषद मैदानावर छत्रपती कृषी औद्योगिक वाहन महोत्सवाचे उद्घाटन कृषितज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा उदयनराजेंनी मांडताना आगपाखड केली. भाषण करतेवेळी चक्क स्टेजवरून खाली पायऱ्यावर मांडी घालून बसले. आज आपण खुर्चीत बसतोय उद्या हातात वाडगे घेऊन बसावे लागेल असे सांगत उदयनराजे मांडी घातली.
हो, मी स्वार्थी आहे : छ. उदयनराजे
ज्या वेळेस लोक सत्ता स्वतःच्या हातात घेतील अन् म्हणतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अोळखत नाही. अशी परिस्थिती देशाची होवू देवू नका, हे सर्व देशवासियाच्या हातात आहे. आपण जास्त छातीठोकपणे सांगतो ना, हा देश सर्वात मोठी लोकशाही असलेला आहे. या देशात सर्व जाती- धर्माचे लोक राहतात पण या देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण खुर्चीत बसतोय, पण उद्या वाडगं घेवून बसणार. तेव्हा अशी अवस्था तुमची, तुमच्या भावी पिढीची करायची आहे. तुम्हांला प्रगतीचा मार्ग कळायला पाहिजे, तुम्ही सुज्ञ आहात. अनेक लोक म्हणतात काहीतरी स्वार्थ असतात म्हणून करतात. माझाही स्वार्थ आहे, तो म्हणजे तुमचे कल्याण झाले पाहिजे.