हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. NDA कडून जगदीप धनकड तर विरोधकांकडून मार्गारेट अल्वा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. या निवडणुकीत धनकड यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत धनकड यांना 528, तर अल्वा यांना 182 मते मिळाली. त्याचवेळी 15 मते रद्द करण्यात आली. धनकड हे विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे आणि नवीन उपराष्ट्रपती 11 ऑगस्ट रोजी शपथ घेतील.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 पैकी 725 खासदारांनी मतदान केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मिळून एकूण सदस्यसंख्या 788 आहे, त्यापैकी वरच्या सभागृहाच्या आठ जागा सध्या रिक्त आहेत. अशा स्थितीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 780 खासदार मतदानासाठी पात्र ठरले. या खासदारांच मतदान पार पडून आजच निकाल जाहीर झाला आहे.
Delhi | NDA candidate Jagdeep Dhankar won by 346 votes as he bagged 528 of the total 725 votes that were cast. While 15 were termed invalid, Opposition candidate Margret Alva received 182 votes in the election: LS Gen-Secy Utpal K Singh pic.twitter.com/ZNHcbmftAU
— ANI (@ANI) August 6, 2022
धनकड यांचा शेतकरी कुटुंबात जन्म –
उपराष्ट्रपती झालेले जगदीप धनकड यांचा जन्म झुंझुनू जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला. चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी केले. धनकड हे क्रीडाप्रेमी म्हणूनही ओळखले जातात आणि ते राजस्थान ऑलिम्पिक असोसिएशन आणि राजस्थान टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहेत.
धनकड यांची राजकीय कारकीर्द –
धनकड हे 1989 च्या लोकसभा निवडणुकीत झुंझुनू येथून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी 1990 मध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते मंत्रीही होते. 1991 मध्ये धनकड यांनी जनता दल सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वेळी 1993 मध्ये ते अजमेरमधील किशनगडमधून आमदार झाले. यानंतर 2003 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धनकड यांची जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यासाठी अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.