Wednesday, February 1, 2023

जय शिवराय : ऐतिहासिक वसंतगड संवर्धनासाठी 24 तासात 5 लाख रूपये

- Advertisement -

कराड | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन व स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या तळबीड व वसंतगड गावाशेजारी ऐतिहासिक किल्ले वसंतगड आहे. या वसंतगड किल्ल्यासाठी पडझड झालेल्या बुरूजांच्या बांधकामासाठी अवघ्या 24 तासात 5 लाखांचा निधी जमा झाला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गसेवकांनी निधी जमा केला आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी आवाहन केले होते. राज्यभरातील दुर्गसेवकांनी दुर्ग संवर्धन कार्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह लाखो मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष राज्यभरातील गडकोट आजही आपणास देत आहेत. गेली 350 वर्ष ऊन, वारा, पाऊस झेलत हा गड डौलाने उभा आहे. गडकोटांना पुनर्वैभव प्राप्त करून देत दुर्ग संवर्धन ही व्यापक चळवळ व्हावी. यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यभरातील गडकोटांवर संवर्धनाचे कार्य अविरत सुरू होते. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे हे आपल्या सहकारी दुर्गसेवकांसह या किल्ल्यासाठी पाठपुरावा करत होते. पडझड झालेल्या बुरूजांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य पुरातत्व खात्याकडे ते पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्यास यश मिळाले. जून महिन्यात या किल्ल्याच्या बुरूजांची पुनर्उभारणी करण्यास मान्यताही मिळाली आहे.

- Advertisement -

त्यानंतर 3 महिन्यांपूर्वी 24 जूनला श्रमिक गोजमगुंडे यांच्यासह मान्यवर, टीमने निधी संकलनासाठी सुरुवात केली. कोरोनासह अन्य काही कारणांमुळे निधी संकलनास अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर शनिवार, 2 ऑक्टोबरला श्रमिक गोजमगुंडे यांनी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांना किल्ले वसंतगडसाठी साद घातली होती. रविवारी सायंकाळपर्यत आवश्यक तो सर्व निधी संकलन करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले होते.

या आवाहनास प्रतिसाद मिळाला. अवघ्या 24 तासात सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी तब्बल 5 लाखांचा निधी संकलित केला आहे. त्यामुळेच आता किल्ले वसंतगडावरील पडझड झालेल्या बुरूजांच्या पुनर्बांधणीचा मार्ग सुकर झाला. लवकरच या कामास प्रारंभ होणार आहे.