Sunday, March 26, 2023

नरेंद्र मोंदींच्या ‘त्या’ ट्विटवर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे झाले भावूक, म्हणाले..

- Advertisement -

नवी दिल्ली । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट आपल्या काळजाला भिडले असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले. प्रकृतीच्या कारणास्तव आबे यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावेळी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी आबे यांचे कौतुक करणारे ट्विट केले होते. शिंजो आबे यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांचे ट्विट काळजाला भिडले आहे. भविष्यातही भारत आणि जपान यांच्यातील मैत्री कायम राहिल व आणखी वृद्धिगंत होणार असल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या सदिच्छांसाठी आभार मानले आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी वृद्धिगंत होतील असा विश्वासही व्यक्त केला.

शिंजो आबे हे आतड्यासंबंधीच्या आजाराने ग्रस्त आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या या आजाराने पुन्हा उचल खाल्ली. उपचाराअभावी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळता येणार नसल्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागत राजीनाम्याची घोषणा केली. आबे यांच्यानंतर पंतप्रधानपदी कोण असणार, याची लवकरच घोषणा होणार आहे. तोपर्यंत आबे पंतप्रधानपदावर असणार आहेत. शिंजो आबे हे मागील आठवड्यात दोन वेळेस रुग्णालयात दाखल झाले होते. सातत्याने रुग्णालयात उपचारासाठी जात असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी जवळपास सात तास आबे रुग्णालयात दाखल होते. आबे यांच्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले ते पहिलेच पंतप्रधान आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी
शिंजो आबे यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आबे यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढणारे ट्विट केले होते. पंतप्रधान मोदी यांनी आबे यांच्या प्रकृती स्वास्थासाठी शुभेच्छा दिल्या. आबे यांच्या प्रकृती अस्वास्थाची बातमी ऐकून मनाला वेदना झाल्याचे मोदींनी म्हटले होते. आबे यांचे कुशल नेतृत्व आणि प्रतिबद्धता यांच्यामुळे भारत-जपान यांच्यातील संबंध आणखी मजबूत झाले असल्याचेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.