कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
वनसंपत्तीचे जतन व संवर्धन करा तरच आपले जीवन सुखकारक होईल हा संदेश देत राज्यात सुख-शांती नांदावी यासाठी निसर्गाला खंडोबाचा भंडारा व जानाईदेवीचा गुलाल, नारळ अर्पण करून मार्तंड जानाईदेवीच्या हजारो भक्तांसह मणदुरे (ता. पाटण) येथील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जळवखिंडीजवळील उंच काऊदऱ्यावर आज निसर्गपूजेचा सोहळा उत्साहात साजरा झाला.
जेजुरीतील पर्यावरणाचा ऱ्हास, प्रचंड वृक्षतोड, जंगलतोड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यातच प्रदूषण, खेड्यातून होणारे सिमेंटचे जाळे, परंपरा, संस्कार जपणाऱ्या खेड्यांचे वाढते आधुनिकीकरण यामुळे झालेली बेसुमार वृक्षतोड या कारणांनी शुद्ध हवा मिळणेही अवघड झाले आहे. जिल्ह्यातील पाटण, तारळे, सातारा निसर्गप्रेमी आणि समस्त जेजुरीकर गावकऱ्यांनी आपली शेकडो वर्षांची धार्मिक यात्रा, उत्सव पालखी परंपरेला गेल्या काही वर्षात पर्यावरण रक्षणाची जोड देवून जनजागृती करत वसुंधरा उत्सव साजरा केला जात आहे. आपल्या धार्मिक परंपरा व श्रद्धेनुसार हजारो मित्र सह्याद्रीच्या उंच कड्यावरून निसर्गपूजा साजरी करण्यात आली.
जानाईदेवी अन्नदान पदयात्रा सेवा आणि जेजुरी ग्रामस्थ यांच्यावतीने होणाऱ्या निसर्ग पूजेला हजारो लोकांनी हजेरी लावली. जेजुरी येथून धार्मिक विधिपूर्वक चांदीच्या रथासह पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या पारंपरिक बैलगाड्यांचा ताफा पूजेकरता आला होता. असून सुमारे दोनशे किलोमीटरचा जयाद्री ते सह्याद्री असा प्रवास करत भाविक प्रथम निसर्गपूजेला काऊदऱ्याला आले होते. या निसर्गपूजेत येथील डोंगरवासी महिलांना साडीचोळी आणि वृक्ष देवून सन्मानित करण्यात आले. तर वसुंधरेला भंडारा उधळून हरितक्रांती व पर्जन्यवृष्टीकरता प्रार्थना करण्यात आली.