दहिवडी | माण तालुक्यातील अवैध वाळू तस्करी आणि वाळू तस्करांबरोबर अधिकार्यांचे असलेले आर्थिक व्यवहारांचे साटेलोटे थेट विधिमंडळाच्या सभागृहात मांडण्यात आले. वरिष्ठ अधिकार्यांना कसे आणि किती हप्ते दिले जातात? याविषयीची वाळू तस्कर आणि तलाठ्यांमधील ऑडिओ आणि व्हिडीओ क्लीप असणारा पेनड्राईव्हच आ. जयकुमार गोरेंनी सभागृहात सादर केला. यावर विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी दिले.
आ. गोरे म्हणाले, गेल्या महिन्यात तर वाळू तस्करांकडून वरिष्ठ अधिकार्यांना कसे आणि किती हप्ते दिले जातात हे दाखवणारी ऑडिओ आणि व्हिडीओ क्लीपच व्हायरल झाली होती. पाच तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तहसीलदारांची बदली केली होती. या प्रकरणातील बडे मासे मात्र मोकाट सुटले होते. आ. जयकुमार गोरे यांनी अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडताना त्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लीपचा पेनड्राईव्हच विधिमंडळात सादर केला.
आ. गोरे म्हणाले, माण तालुक्यात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. वाकी येथे पाच तलाठ्यांच्या पथकाने जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर अशी वाळू उपसा करणारी वाहने आणि वाळूचा अवैध साठा पकडला होता. त्या ठिकाणी सगळे वाळू तस्कर आले आणि तलाठ्यांच्या कारवाईला विरोध केला. आम्ही पोलिस स्टेशन, तहसीलदार, कलेक्टरला हप्ता देतो त्यामुळे आमच्यावर कारवाई करता येणार नाही. आम्ही वीस लाखांचे हप्ते देतो, तुम्ही आमची वाहने पकडताच कशी असा दम देवून तस्कर तलाठ्यांसमोरुन वाहने घेऊन गेले. या संभाषणाच्या क्लीप सर्वत्र व्हायरल झाल्या. मी स्वतः तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकार्यांबरोबर बोललो. कोणतीच कारवाई होत नव्हती. या विषयीच्या बातम्या आल्यावर फक्त तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली.