सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेना भाजपबरोबर सत्तेत बसतांना आपल्या अटींवर कायम असून राज्यात सत्ता नेमकी कोणाची येणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. भाजपवर दबाव तंत्राचा वापर करत शिवसेना इतर पर्यायांचा विचार करू शकते असे संजय राऊत वारंवार सांगत आहेत. भाजपनेही शिवसेनेला दटावत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू असे अल्टिमेटम दिले. दरम्यान राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांनी या सर्व प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील म्हणाले कि,’ आम्हाला विरोधी पक्षातच स्वारस्य आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे त्यांनीच सत्ता स्थापन केली पाहिजे. राज्यात जनतेने महायुतीला मताधिक्य दिले आहे तेव्हा त्यांनी सत्ता स्थापन केली पाहिजे. मात्र शिवसेनेने पाठिंबा दिल्याशिवाय भाजपा सत्ता स्थापन करू शकत नाही. भाजपने शिवसेनेवर अन्याय करू नये. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं.’ असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
तसेच आमचा कोणताही आमदार भाजपच्या गळाला लागणार नाही. भाजपा इतर पक्षाच्या आमदारांना अमिष दाखवत आहे, मात्र जो आमदार जाईल त्याला इतर सर्व पक्ष मिळून पराभूत करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.