वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उंचीवर कोणाच्याही स्मारकाची उंची जाऊ नये म्हणुनच शिवस्मारकाची उंची कमी करण्यात आली – आ.जयंत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उंचीवर कोणाच्याही स्मारकाची उंची जाऊ नये म्हणुनच शिवस्मारकाची उंची कमी करण्यात आली असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते.

‘शिवस्मारकाची उंची कमी केली याचे कारण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उंचीवर कोणाच्याही स्मारकाची उंची जाऊ नये, अशी या सरकारची मानसिकता आहे’, असे म्हणत पाटील यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. तसेच ‘दोन आठवडे सभागृह चालूनही वेगवेगळे विषय हाताळले गेले नाही. राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न राहून गेले. अधिवेशनाची मुदत वाढवा अशी मागणी करुन देखील या सरकारची तशी भूमिका नाही. विरोधी पक्षाची भूमिका ऐकून घेण्याची क्षमतासुद्धा या सरकारमध्ये नाही’ असे म्हणत पाटील यांनी भाषणाला गैरहजर असलेल्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

‘हे सरकार ऑनलाईन आहे मात्र जे ५ टक्के लोक सुशिक्षित आहेत त्यांनाच याचा फायदा होतो, बाकीच्यांचे काय?’ असा सवालही पाटील यांनी यावेळी सरकारला विचारला. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणंच आम्ही बंद केले आहे कारण हे सरकार सर्रास सर्व मंत्र्यांना क्लिनचीट देऊन टाकते. साम, दाम, दंड, भेद पद्धतीने राज्य करण्याची भूमिका सरकारची आहे हे जनतेला दिसून आले आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. आपल्याकडे आकडेवारी याची वाढतच चालली आहे. राज्य सुरक्षा आयोगाशी किती वेळा बैठका झाल्या याची माहिती आपण देऊ शकाल का, असा सरकारला प्रश्न केला.

Leave a Comment