मुंबई प्रतिनिधी | बीड विधानसभा चुलत्या पुतण्याच्या तुंबळ युद्धाने रंगणार हे मागील काही महिन्यापासूनच निश्चित झाले होते. याचाच एक भाग म्हणून चुलते जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेच्या उमेदवारीचा एबी फॉर्म मिळाला आहे. तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी आधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे चुलते शिवसेनकडून तर पुतण्या राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे चित्र बीडच्या राजकारणात बघायला मिळणार आहे.
बीडच्या नगराध्यक्ष पदावरून जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील कलह शिगेला पोचला आणि त्याचेच रूपांतर राजकीय वैरात झाले. जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी नाही याचा अंदाज बांधून लोकसभेची निवडणूक पार पडताच शिवसेनेत प्रवेश केला. तर त्यांच्या पुतण्याने त्यांच्यावर राष्ट्रवादीत राहून आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली. आपल्या चुलत्याने ५० कोटी उद्धव ठाकरेंना देऊन मंत्रिपद विकत घेतले असा गंभीर आरोप संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर लावला. मात्र शिवसेनेकडून त्यांच्या टीकेला उत्तर दिले गेले नाही.
दरम्यान संदीप क्षीरसागर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जयदत्त क्षीरसागर यांना ते वरचढ ठरणार अशी बीडमध्ये चर्चा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या धबडग्यात बीडची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.