पाटणा । नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीआहे. सोमवारी संध्याकाळी राजभवनात पार पडलेल्या 14 सदस्यीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. याच दरम्यान माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे फक्त नामधारी मुख्यमंत्री असतील अशी टीका सिन्हा यांनी केली आहे. भाजपा आपल्या मित्रांना निर्जीव होईपर्यंत पिळून घेतो असं देखील सिन्हा यांनी म्हटलं आहे.
यशवंत सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “नितीश कुमार हे फक्त नामधारी मुख्यमंत्री, भाजपा पिळून फेकून देईल” असं म्हटलं आहे. तसेच “आपण मुख्यमंत्री बनणार नाही असं नितीश कुमार एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर म्हटलं होतं. मात्र मित्रपक्षांच्या आग्रहानंतर ते तयार झाले. भाजपाला सर्वाधिक जागा आल्याने त्या पक्षाच्या एखाद्या नेत्याने मुख्यमंत्री बनावे, असे आपल्याला वाटत असल्याचे नितीश कुमार यांचे म्हणणे होते.
BJP squeezes it's enemies till they become lifeless. It does the same to its friends. Nitish Kumar is the latest example of this. He will be CM but only in name.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) November 16, 2020
रिमोट कंट्रोल भाजपाच्या हाती
नितीश कुमार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण यावेळी राज्याची सूत्र दुसर्याच्या कोण्याच्या तरी हाती असतील असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाने राजकीय खेळी करून नितीश कुमार यांची ताकद कमी केली असा आरोप देखील अन्वर यांनी केला आहे. “नितीश कुमार हे पूर्वी एनडीए आघाडीचे मोठे नेते आणि मुख्यमंत्री होते. मात्र यावेळी भाजपाने त्यांना आपल्या रिमोट कंट्रोलवर चालणारा मुख्यमंत्री बनवलं आहे” असं तारिक अन्वर यांनी म्हटलं आहे.
तारिक अन्वर यांच्या काँग्रेस पक्षाने महाआघाडी अंतर्गत बिहारमध्ये एकूण 70 जागा लढवल्या. पण फक्त 19 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. जागावाटपात उशीर झाल्याने आवश्यक तेवढा प्रचार करता आला आहे, हे पराभवाचं कारण असल्याचं तारिक अन्वर यांनी याआधी म्हटलं होतं. तसेच बिहारमध्ये सत्ता बदलाची लाट आली. पण ही संधी आम्हाला मिळवता आली नाही असं देखील ते म्हणाले होते.
भाजपाच्या वाट्याला ७ मंत्रिपदे
भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणुदेवी यांना उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नसल्यामुळे या दोघांनी मंत्री म्हणूनच शपथ घेतली असून मंत्रिमंडळात त्यांना हा दर्जा दिला जाईल. हे दोघेही व्यासपीठावर नितीशकुमार यांच्या बाजूला बसले होते. जेडीयूच्या पाच मंत्र्यासह हिंदुस्थानी अवामी मोर्चा (हम) आणि विकासशील इन्सान पार्टीच्या (व्हीआयपी) प्रत्येकी एका सदस्याला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. बिजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी, विजयकुमार चौधरी या जुन्या सहकाऱ्यांसह मेवालाल चौधरी आणि शीलाकुमारी मंडल हे जदयूचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in