हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये जेजुरी गडाचे (Jejuri Gad) नाव हमखास नोंदवले जाते. याच जेजुरी गडावर दसऱ्याच्या दिवशी आणि महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी भक्तांची मोठी गर्दी दिसून येते. भाविकांची अशी मान्यता आहे की, स्वयम माता-पार्वती आणि भगवान शंकर या जेजुरी गडावर वास करतात. जेजुरी ही खंडोबाच्या नावाने ओळखली जात असली तरी खंडोबाला देखील शंकराचे रूपच मानले जात असे. त्यामुळेच कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर व पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक खूप दूरवरून जेजुरी गडावर येत असतात.
महाशिवरात्रीला घेता येते दर्शन
परंतु जेजुरी गडावर आणखीन एक शिवलिंग आहे जे गुप्त मंदिरातील तळ घरात वसलेले आहे. जेजुरी गडावर असणारे स्वयंभू शिवलिंग पातालोकी शिवलिंग मानले जाते. खास म्हणजे, फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांच्या दर्शनासाठी या गुप्त शिवलिंगाचे दार उघडले जाते. इतर कोणत्याही वेळी या गुप्त शिवलिंगाचे दर्शन भाविकांना घेता येत नाही. तळघरात असलेले हे शिवलिंग वर्षातून एकदाच महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी उघडले जाते. मात्र मुख्य मंदिरामध्ये असणारे स्वयंभू शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी दररोज खुले असते. महाशिवरात्रीच्या दिवशी या शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
धार्मिक कथांमध्ये म्हटले आहे की, पृथ्वीवरील भक्तांच्या कल्याणासाठी आणि त्यांना असूरांपासून वाचवण्यासाठी भगवान शंकर आणि पार्वती खंडोबा आणि म्हाळसाच्या रूपामध्ये अवतरले होते. तेव्हापासून या जेजुरी गडावर खंडोबा आणि म्हाळसाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीबरोबर दसऱ्याच्या दिवशी देखील जेजुरी गडावर मोठी गर्दी पाहायला मिळते. तसेच, गडावर असलेले शिवलिंग सर्व मनोकामना पूर्ण करते अशी श्रद्धा ठेवून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. परंतु आजवर जेजुरी गडावर हे शिवलिंग कोठून आले, ते मंदिराच्या तळघरात कसे वसले गेले हे अजूनही कोणाला माहीत नाही.