हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचा असल्याचे जाहीर केले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिले आहे. या निर्णयानंतर अजित पवार गटावर विरोधक आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेते जोरदार टीका करत आहेत. आता “शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी हा कट रचला जात आहे” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ताशेरे उडत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “आम्ही निवडणूक आयोगाकडे पर्याय मागितले होते पण त्यांनी आम्हाला पर्याय दिलेच नाहीत. आमच्याकडे तसं पत्र आहे. याचाच अर्थ निवडणूक आयोग एकतर खोटं तरी बोलतंय किंवा निवडणूक आयोग विसरभोळं आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आम्ही त्यांना तीन पर्याय दिले होते पण त्याकडे लक्षच दिलं गेलं नाही”
शरद पवारांची राजकिय हत्या…
त्याचबरोबर, “शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांची राजकीय हत्या करण्यासाठी, त्यांचे राजकीय वजन कमी करण्यासाठी किती मोठा कट रचला जातोय. पण, यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना किती दुखावल्या जात आहेत याची कल्पना निवडणूक आयोगाला नाहीये. निवडणूक आयोगासारखी महत्त्वाची संस्था जर कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररित्या निर्णय घेणार असेल तर हे सगळं हास्यास्पद आहे” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
तसेच, “84 वर्षांच्या माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही” असे देखील आव्हाड यांनी म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे याचा मोठा धक्का शरद पवार गटाला बसला आहे. आता शरद पवार गट न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाईल, असे त्यांच्याच गटातील नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात कोणत्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.