हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे दोघे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्यातील निखळ मैत्री कोणापासून लपलेली नव्हती. २००६ मध्ये शरद पवार आजारी असताना बाळासाहेब ठाकरेंनी अत्यंत आपुलकीने शरद पवारांच्या तब्ब्येतीची विचारपूस करणारे आणि प्रकृतीची काळजी घ्या असं आवाहन करणारे पत्र लिहिले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बाळासाहेबांचे तेच पत्र सोशल मीडियावर शेअर करत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे.
बाळासाहेबांनी शरद पवारांना लिहिलेलं पत्र जसेच्या तस –
“प्रिय शरदबाबू यांसी जय महाराष्ट्र! आपण केंद्र शासनात कृषिमंत्री या पदावर विराजमान आहात. तरीपण हे पद बाजूला सारून आपल्याला मी माझे जुने मित्र शरदबाबू या नावानेच विचारणार आणि बोलणार. आपण बरे झालात हे ऐकून बरे वाटलेः परंतु वडीलधाऱ्या अधिकाराने आम्ही आपल्याला आदेश देत आहोत की, यापुढे जरा वणवण कमी करा. झेपेल तेवढे जरूर करा! पण अलीकडे आपला दौऱ्यावर जाण्याचा सुकाळ झाला होता. वाकड्यातिकड्या मार्गाने आपण दौरे करीत होता, परदेश दौऱ्यांतही कोठे कमतरता नव्हती, आपल्या पक्षाची निशाणी जरी घड्याळ असली तरी आणि त्या घड्याळाचे काटे जरी स्थिरावले असले तरी आपल्या आयुष्याचे घड्याळ टिक टिक करीत त्याचे काटे पुढे सरकतच असतात हे विसरू नये.
शिवसेना प्रमुखांचे पत्र शरद बाबूंना
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2024
आदेश दिला होता त्यांनी
थोरला म्हणून
प्रत्येक शब्दात आपलेपणा
नाहीतर द्वेश सुडानी भरलेले आजचे राजकारण
कोण कधी मरतो ह्याची वाट पाहणारे
नवीन पिढी हे वाचेल तर म्हणेल
“राजकरणात एवढी प्रेम आपुलकी एकमेकांन बद्दल होती” pic.twitter.com/c2SQU1h1Hz
सोनियाच्या ‘कथली’ राजवटीत आपण अन्न व शेती मंत्री आहात. सध्याच्या परिस्थितीत हे महत्त्वाचे खाते आपण सांभाळीत आहात. त्यामुळे फक्त महाराष्ट्राला नव्हे तर, देशाला आपली गरज आहे. पुन्हा बजावतो, महाराष्ट्राला तर आपली नक्कीच गरज आहे; परंतु देशाची भयानक अवस्था पाहिल्यावर आपल्यासारख्याची देशाला नितांत गरज आहे. त्यामुळे स्वतःसाठी नसले तरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तुम्हाला जगावेच लागेल, त्याप्रमाणे वागणूक ठेवावी व प्रकृतीची काळजी घ्यावी असं बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हंटल होते.
जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर निशाणा –
हे पत्र शेअर कर जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना प्रमुखांचे पत्र शरद बाबूंना आदेश दिला होता त्यांनी थोरला म्हणून प्रत्येक शब्दात आपलेपणा… नाहीतर द्वेश सुडानी भरलेले आजचे राजकारण, कोण कधी मरतो ह्याची वाट पाहणारे…. नवीन पिढी हे वाचेल तर म्हणेल….. “राजकरणात एवढी प्रेम आपुलकी एकमेकांन बद्दल होती असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षावर टीका केली आहे.