Monday, February 6, 2023

सातारा लोकसभा व कराड दक्षिणमध्ये कमळ निवडून येणारच : बाळा भेगडे

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपाला विजय मिळविता आला नाही, त्या सर्व जागांवर येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य पक्षाने निश्चित केले आहे. यासाठी भाजपाने आखलेल्या लोकसभा प्रवास योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, सातारा लोकसभा व कराड दक्षिण मतदारसंघात यावेळच्या निवडणुकीत कमळ निवडून येणारच, असा विश्वास माजी राज्यमंत्री तथा भाजपा लोकसभा प्रवास योजनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला पक्षाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, लोकसभा प्रभारी तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, शेखर वडणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्री. भेगडे यांनी कराड दक्षिणमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत बूथ कमिटी रचना, लोकसभा प्रवास अंतर्गत केंद्रीय मंत्री ना. सोमप्रकाश यांचा दौरा याबाबतचा आढावा घेतला.

- Advertisement -

भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्ष हे आपले एक कुटुंब आहे हे मानून कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे. पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मिळतेच. त्यामुळे नवीन व्यक्ती पक्षात आली की आपले अस्तित्व धोक्यात येईल असे कुणीही समजू नये. नव्याने पक्षात येणाऱ्यांचे स्वागत करा. तसेच माझा बूथ मी जिंकून देणार हा निर्धार प्रत्येक बूथ प्रमुखाने करावा, असे आवाहन श्री. भेगडे यांनी केले.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यावर महाराष्ट्रातील लोकसभा प्रवास योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संघटन वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. येत्या काळात जि.प., पंचायत समितीसह नगरपालिकांच्या निवडणुका पक्ष चिन्हावर ताकदीने लढवून, सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार आपण सर्वांनी करुया.

याप्रसंगी डॉ. सारिका गावडे, व्ही. के. मोहिते, मुकुंद चरेगावकर, नारायण शिंगाडे, सुनील पवार, धनाजी जाधव, राहुल पाटील, डॉ. राजकुमार पवार, मुंढे गावचे माजी सरपंच रमेश लवटे, उमेश शिंदे, संतोष हिंगसे, हेमंत धर्मे, पंकज पाटील, मालखेडचे उपसरपंच युवराज पवार, सुनील बाकले, तानाजी देशमुख, प्रशांत कुलकर्णी, मारुती जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद चरेगावकर यांनी आभार मानले.