सातारा | साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने जगातील तिसरे सर्वात उंच असलेले कांचनजंगा शिखर सर केले आहे. प्रियांकाने ही मोहिम गुरुवारी फत्ते केली. तेनजिंग नोर्गे नॅशनल अॅडव्हेंचर अवॉर्ड 2020 प्राप्त करणाऱ्या प्रियांका मोहितेने मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. यानंतर तिने बेस कॅम्पवर उतरण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ती भारतात परतणार असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली.
अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली महिला
अन्नपूर्णा शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला होती. कांचनजंगा माऊंटवरील यशानंतर प्रियंका 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
प्रियांकाकडून 4 सर्वात उंच शिखर सर
कांचनगंगा हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के-2 यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात आहे. याची उंची 8,586 मी (28,169 फूट) इतकी आहे. तर या अगोदर माऊंट एव्हरेस्ट उंची 8, 848 मी, माऊंट लोटस- 8, 516 मी, माऊंट मकालू- 8, 463 मी, माऊंट अन्नपूर्णा 1- 8, 091 मी माऊंट सर केलेली आहेत.