नवी दिल्ली । सोमवारी दीर्घ चर्चेनंतर सोनिया गांधी यांची पुन्हा एकदा पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनतर नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्या G-२३ नेत्यांपैकी काही प्रमुख नेत्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसमधील बंड शमले नसल्याचे बोललं जात आहे.
सोनिया गांधी यांची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कपिल सिब्बल (kapil Sibal), शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यसह काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी सोमवारी रात्री गुलाम नबी आझाद यांच्या निवसस्थानी बैठक घेतली. या बैठकीत मुकुल वासनिक आणि मनीष तिवारी (Manish Tewari) यांच्यासह सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करणारे इतरही काही नेते हजर होते. या बैठकीत काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीनंतरच्या स्थितीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, तब्बल ७ तास चाललेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा हात मजबूत करण्याचा सर्वोपरी प्रयत्न केला जाईल असा प्रस्ताव पारित करण्यात आला. याशिवाय सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ ज्येष्ठ नेत्यांची काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अनेक दिग्गज नेत्यांनी कानउघाडणी केली. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर सोनिया गांधी अतिशय नाराज आहेत. सोनिया गांधीची पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती केल्यानंतर त्यांचे स्थान पक्षात मजबूत झाले आहे. तर विरोध करणाऱ्या नेत्यांसाठी आता पक्षात स्थिती बिकट झाल्याचे संकेत मिळत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”