कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पश्चिम महाराष्ट्र व कोकण यांना जोडला जाणारा महामार्ग म्हणजे कराड चिपळूण राजमार्ग … मुंबई-बेंगलोर एक्सप्रेस होण्यापूर्वी हाच मार्ग सोयीस्करपणे वापरला जात होता.मात्र आज पश्चिम महाराष्ट्र ते कोकण हा प्रवास याच रस्तावरुन होतो. यामार्गावरील वाहने व प्रवाशी यांची संख्या दररोज लाखात असते. मध्यंतरी वाहने व प्रवासी संख्या वाढत असल्याने रस्ता रुंदीकरणाची मागणी वाढू लागली. यातूनच हा राजमार्ग आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित झाला आहे. विकास हा प्रगत राष्ट्रासाठी झालाच पाहिजे. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियम सुध्दा ठेकेदारांनी पाळायला पाहिजेत. मात्र कराड-चिपळूण महामार्गाचे ठेकेदारांनी तीन तेरा वाजवले.
या मार्गावरुन वाहने चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. जागोजागी अपुरा खोदून ठेवलेला रस्ता व वाहनांमुळे उडत असलेला धुरळा त्यामुळे नक्की गाडी कुठे आहे याचा अंदाज घेऊनच गाडी चालवावी लागते. या रस्तावरील स्थानिक प्रवाश्यांच्या डोळ्याच्या व श्वसनाच्या विकारात मोठी भर पडली आहे. नियमित पाणी मारणे अपेक्षित असूनही ठेकेदार ते करत नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष आहे.
या कामाचा फटका हॉटेल व्यावसायिकांनाही बसला आहे. या रस्त्याच्या कामामुळे हॉटेलच्या ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र आहे.
या रस्त्यावरील झाडे तोडताना शेतकरी, प्रशासन आणि ठेकेदार त्यांच्यामध्ये मोबदल्यावरून खटके उडत आहेत. शेतकऱ्यांनाही या कामाचा फटका बसत आहे.