कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या वर्षी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या मंडपाचे रविवारी उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, उपनिबंधक तथा बाजार समितीचे प्रशासक संदीप जाधव, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी राज्यस्तरीय कृषी,औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे हे प्रदर्शन झाले नव्हते. मात्र, आता हे प्रदर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. प्रदर्शनाच्या तयारीला शेती उत्पन्न बाजार समिती, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा तयारीला लागली आहे.
प्रदर्शनासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचा आज मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी शेतकरी व बाजार समितीचे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावर्षी प्रदर्शनाचे ‘प्रथम शेती’ हे ब्रीद असून या प्रदर्शनाची संकल्पना संरक्षित शेती आहे. लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे संरक्षित शेतीची विविध प्रात्यक्षिके या प्रदर्शनामध्ये दाखवली जाणार आहेत.
यावर्षी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार असून त्यांच्यासाठी मोफत स्टॉल देण्यात येणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती उत्पन्न बाजार समितीत 20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावयाचे आहेत. या प्रदर्शनाच्या एकंदरीत तयारीला वेग आला असून शेतकरी केंद्रित या प्रदर्शनामध्ये यावर्षी अनेक नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रदर्शनात 400 हून अधिक असणार स्टॉल
या प्रदर्शनात 400 हून अधिक स्टॉल सहभागी असून प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर स्वागत अध्यक्ष म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. या कार्यक्रमास राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.




