कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड पालिकेच्या सफाई कर्मचार्यांच्या जागा व घरे याबाबत पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने अनेकवेळा नगरपालिका प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, याबाबत केवळ ठराव घेतले जात असून पुढील कार्यवाही केली जात नाही. याविरोधात पालिका कर्मचारी संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सोमवारी देण्यात आला. “मागण्यांची त्वरीत अंमलबजावणी करण्यात आली नाही तर ऑगस्ट महिना अखेरपर्यंत काम बंद आंदोलन करू, अशा इशाऱ्याचे निवेदनही आज पालिका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनास दिले.
निवेदनात म्हटले आहे की, 2017 व 2018 सालापासून पालिकेचे सफाई कर्मचारी शासनाच्या नियमानुसार जागा व घराची मागणी करत आहोत. पालिकेने याबाबत पाचवेळा ठराव केला. ठराव करून सुद्धा त्याची नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे दि. 8 जुलै रोजी सर्व कर्मचार्यांनी नोटीस देऊन बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचे ठरवले होते. परंतु नगरपरिषद प्रशासन व इतर बाबींचा विचार करून याबाबत विशेष सभा घेऊन कर्मचार्यांना जागा व घरी देण्याचा ठराव करण्यात आला. परंतु एक महिना झाला तरी सुद्धा अजून जागा व घराबाबत ठोस पावले उचलली नाही.
पालिका लोकप्रतिनिधींकडून केल्या जात असलेल्या मागण्यांच्या दुर्लक्षाविरोधात सर्व कर्मचारी यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण होत आहे. तरी याबाबत परत संप व काम बंद आंदोलन होऊ नये याकरता जागा व घरासंबंधी त्वरित निर्णय घ्यावा. तसेच संघटनेच्या पदाधिकार्यांशी याबाबत चर्चा करून तोडगा काढावा, अन्यथा नाईलाजास्तव महिनाअखेरपर्यंत काम बंद आंदोलन करू, अशा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या इशाऱ्याचे निवेदन पालिका कर्मचारी सन्घटनेचे पदाधिकारी यांनी आज पालिका प्रशासनास दिले. यावेळी आनंदा खवळे, युवराज भोसले, सुनिता आठवले, दिलीप चौगुले व इतर कर्मचारी उपस्थित होते.