कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
घंटागाडी प्रकरणावरून आज रविवारी (दि. 11) झालेले राजकारण हे अतिशय निंदनीय, घाणरडे राजकारण स्वतःला सर्वज्ञ समजणारे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी मुद्दाम घडवून आणले आहे. काही विशिष्ट ठेकेदारांची मोठमोठी बिले आणि मोठी टेंडर नगराध्यक्षा यांच्याकडे सह्याला आली, कि दुस-या मिनटाला नगराध्यक्षा यांनी सह्या केल्या पाहिजेत. हीच त्यांची गेल्या साडेचार वर्षात भूमिका राहिली आहे, नगरपालिकेची मिटिंग असुद्या, चर्चा असुद्या ह्यांना फक्त विशिष्ठ मोठ्या ठेकेदरांची बिले, मोठी टेंडर यातच यांचा जास्त इंटरेस्ट असतो. आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर जावून दुस-यांच्या अधिकारात ढवळाढवळ करायची, आणि सर्व नगरपालिका मीच चालवतो असा अविर्भाव आणून दुस-याला कमी लेखायचे असा हल्लाबोल नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, घंटागाडी टेंडर संदर्भात बुधवार दिनांक 7 जुलै 2021 रोजी दुपारी सदर टेंडर माझ्याकडे साहिला आले. कोणतीही गोष्ट सहीला आली कि त्याची संपूर्ण माहिती घेऊन मगच प्रोसेस होऊन सही होत असते. माहितीसाठी मी आरोग्य अधिकारी श्री. भालदार यांना निरोप दिला असता ते सातारा येथे मिटींगला गेले आहेत असे कळले. त्यामुळे, त्यादिवशी चर्चा होऊ शकली नाही. गुरुवार दिनांक 8 जुलै 2021 रोजी नगरपरिषदेची विशेष सभा होती. सभेनंतर या टेंडर मधील मला काही गोष्टींची माहिती घेण्यासाठी मी सर्व फाईल्स मागून घेतल्या व उपनगराध्यक्ष, आमचे गटनेते अण्णा पावसकर यांच्यासोबत टेंडर मधील काही त्रुटीबाबत चर्चा केली.
मात्र आज रविवार सकाळी 7.30 वाजताच आरोग्य सभापती यांनी नगरपालिकेत येवून संबधित कर्मचारी व ठेकेदार यांना तुम्हाला ऑर्डर नाही. तेव्हा तुम्ही काम करायचे नाही, असे सांगून मुद्दाम काम सुरु करू दिले नाही. लगेच एवढ्या सकाळी सर्व पत्रकारांना बोलवून उलट सुलट बातम्या यांनीच पत्रकाराना दिल्या आहेत. यामागे निव्वळ राजकारण असून राजकीय स्टंट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पालिकेची येणारी निवडणूक पाहता त्यांच्याकडून असे प्रकार वारंवार घडवून आणून जाणीवपूर्वक मला व भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा हा त्यांचा केविलवाणा व निरर्थक प्रयत्न सुरु आहे.
कराड शहरात गेली 16 वर्ष स्वच्छता अभियान अतिशय चांगल्या प्रकारे राबवले जात असून आज एकच दिवस निव्वळ वाटेगावकर यांच्या आडमुठी राजकारणामुळे संपूर्ण कराड शहरात घंटागाड्या जावू शकल्या नाहीत. याउलट यानीच शहरात कचरा साठला, रस्त्यावर पडला, असा कांगावा केला. यामुळेच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे हा त्यांचा आरोप म्हणजे नगराध्यक्षा यांना बदनाम करण्यासाठी रचलेले कुभांड आहे. पुढील काळात येणा-या निवडणुका पाहता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आपल्या कराड नगरपालिकेसारख्या मातृसंस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न वाटेगावकर यांनी करू नये, असे नगराध्याक्षा रोहणी शिंदे यांनी म्हटले आहे.
ठेकेदारांची काम सुरू ठेवण्यास मान्यता होती : रोहीणी शिंदे
मी गेल्यावर्षी कोरोना पाॅजिटीव्ह होऊन गेल्यानंतर त्याचे साइड इफेक्ट जाणवू लागल्याने सध्या पोस्ट कोविड संदर्भात डोळ्याच्या काही ट्रींटमेंट घ्याव्या लागत आहेत. यासाठी शुक्रवारी 9 जुलै रोजी मी दावाखान्यात दाखल होते. शनिवार व रविवार शासकिय सुट्टी असल्याने सोमवारी सदर टेंडरवर मी सह्या करून देते असे सांगितले होते. याबाबत मी मुख्याधिकारी यांच्याशी बोलले होते, व त्यांना काम सुरु ठेवा कोणत्याही परिस्थितीत काम थांबवू नका असे आदेश दिले होते. संबधीत ठेकेदार यांना सुद्धा मी याच सूचना दिल्या होत्या. ठेकेदार यांनी काम सुरु करण्यास मान्यता दिली होती.