कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शहरात पुन्हा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने आणि नागरिकांवर हल्ला झाल्याच्या घटनात वाढ होत असल्याने नगरपरिषदेच्या वतीने अॅनिमल प्रोटेक्शन क्लबकडून भटकी कुत्री पकडण्याची मोहिम सूरू करण्यात आली. अनेकदा शहरातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरपरिषदकडे केली जात होती. या पार्श्वभूमिवर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी याबाबत अॅनिमल प्रोटेक्शन क्लबच्या मदतीने भटकी कूत्री पकडण्याची मोहिम सूरू केली. या मोहिमेत मादी कुत्री पकडून त्यांच्या नसबंदीवर भर दिला जाणार असल्याचे डाके यांनी सांगितले.
कराड शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना या भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्री दूचाकी गाडीच्या मागे धावण्याचे प्रकार तर सर्रास सुरू आहेत, विविध परिसरात भटक्या कुत्र्यानी नागरिकांवर, लहान मूलांवर हल्ला केल्याच्या घटना ही घडल्या आहेत. भटक्या कुत्र्यांमुळे कराड शहरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावं लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी पालिकेस निवेदन देऊन कूत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
कराड शहरात नगरपालिकेने एप्रिल 2018 मध्ये भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली होती. सुमारे 500 हून अधिक भटक्या कुत्र्यांची धरपकड केली होती. अॅनिमल प्रोटेक्शन क्लबने ही मोहीम यशस्वी केली होती. मोठ्या प्रमाणात या वेळी कुत्र्यांचा बंदोबस्त झाला होता. सध्या शहरात कुत्र्यांची संख्या वाढली असून प्रीतिसंगम बाग, कृष्णा घाट, प्रभात टॉकीज, आंबेडकर पुतळा, बापूजी साळुंखे पुतळा, स्टॅन्ड परिसर, मंडई, चावडी चौकासह त्रिशंकू भागातील काही ठिकाणी ही मोकाट कुत्र्यांचा उपद्रव व मोठा वावर वाढला आहे. आज नगरपरिषदेनजीक भटकी कुत्री पकडताना त्याची पाहणी व सूचना पालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी दिल्या. यावेळी गटनेते राजेंद्रसिंह यादव, नगरसेविका स्मिता हूलवान, कश्मिरा इंगवले उपस्थित होत्या.