कराड | उंदराला मांजर साक्ष, त्यामुळे ठेकेदारांच्या काळ्या यादीचा घोळ काही मिटेना. कराड नगरपालिकेत सध्या निवडणूक समोर ठेवून आपण काय करणार आहोत, विरोधक विकास विरोधी असल्याचा कागांवा सुरू झाला आहे. मात्र यामध्ये कराड वासियांना दररोज प्रवास करणाऱ्या रस्त्यांचा प्रश्न जटील बनला असून चार महिन्यात रस्ते उखडले आहेत. अशावेळी गावचे मेहेरबानांनी काळ्या यादीचा फतवा (ठराव) मांडला, मात्र उंदराला मांजर साक्ष असल्याने नागरिकांना काळी यादी म्हणजे काय आणि केव्हा बाहेर येणार असा प्रश्न पडू लागला आहे.
कराड नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळेच शेवटचे बजेट मांडण्यापासून ते मंजूर करेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. बजेट मंजूर झाले त्याचा श्रेयवाद रंगला. बजेटमुळे तिन्ही आघाड्यांनी सलग तीन दिवस पत्रकार परिषदाही घेतल्या. यावेळी आम्ही शहरासाठी काम करत आहोत. विरोधक शहरांच्या अधोगतीस, नुकसानीस जबाबदार असल्याचा दावा प्रत्येकाने केला.
परंतु या सर्वात महत्वाचे कराडच्या नागरिकांना शहरात प्रवास करताना रस्ते खडेमुक्त होणे गरजेचे आहे. मात्र कोट्यावधी रूपये खर्चून तयार केलेले रस्त्यांवर खड्डे पुन्हा पहायला मिळतात. अनेक ठिकाणी नियमांचे उल्लघंन करून रस्ते तयार केले जातात. रस्त्यांचे नारळ फोडून माझ्यामुळे रस्ता मिळाला म्हणणारे नगरसेवक पुन्हा खड्डे पडल्यानंतर ठेकेदाराने चांगले काम केले नसल्याचे प्रमाणपत्रही तोंडी देतात. मात्र या ठेकेदारावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या समाधानासाठी काळी यादी हा शब्दप्रयोग नगरपालिकेच्या मेहेरबान यांनी शोधला आहे. अशावेळी ती काळी यादी म्हणजे काय आणि केव्हा येणार असा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न केव्हा मेहेरबान सोडवणार?