कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला गुरुवारी संध्याकाळी गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. कराड शहर विजांच्या कडकडाटासह तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. कराड शहरातील पंताचा कोट व शुक्रवार पेठेत वीज पडल्याने दोन झाडे जळाल्याची घटना घडली आहे. कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत झाडावरील आग विझवली.
कराड तालुक्यात दुपारी 4 नंतर पावसाने विजांच्या कडकटासह हजेरी लावली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सुपने- तांबवे, विंग, कोळे, कालवडे, बेलवडे, कासार शिरंबे परिसरात गारांसह पाऊस झाला असून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे.
कराड शहरात वीज कोसळली pic.twitter.com/x3Pf7bkEV3
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 20, 2023
आज दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा दिला. परंतु अचानक कोसळल्याने कामावरून घरी परतणाऱ्या तसेच शेतात काम करणाऱ्यांची पळापळ उडाली. कराड- पाटण मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागली.