कराड प्रतिनिधी|विशाल वामनराव पाटील
कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच लागली असून तब्बल 19 जागांसाठी 67 जण रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात गुरूजन एकता पॅनेल आणि श्री. गुरूमाऊली पॅनेल आमनेसामने आहेत. परंतु या पॅनेलमधून अधिकृत उमेदवार ठरविण्यासाठी चक्क 3 ते 4 लाख रूपयांचा निधी (पार्टी फंड) पॅनेलकडे सोपवावा, असा आदेश दिला असल्याची चर्चा जोरदारपणे शिक्षकांच्यात सुरू आहे.
कराड- पाटण शिक्षक सोसायटी निवडणूकीत कोट्यावधीची उलाढाल होत असते. शिक्षकांची अर्थिक नाडी असलेली ही सोसायटी आपल्या ताब्यात रहावी, यासाठी प्रत्येकांची इच्छा असते. त्यामुळेच या सोसायटी निवडणूकीत सत्ताधारी व विरोधक यांनी निवडणूकीत जोरदार तयारी केली आहे. तर या दोन्ही गटाच्या विरोधात अपक्षांनीही शड्डू ठोकला आहे. सोसायटी निवडणूकीमुळे शिक्षकांच्यातील राजकारणी जागा झाल्याने चांगलेच वातावरण तापले आहे. दोन्ही तालुक्यात आता प्रत्येक शिक्षक उमेदवार पायात भिंगरी बांधून फिरू लागला आहे. पॅनेलमधून उमेदवारी मिळाल्यास विजयाचा मार्ग सोपा होईल, या अशेने अनेकांनी पहिल्यापासून फिल्डिंग लावली होती. त्यामुळे पॅनेलमधून उमेदवारीही फायनल झाली, आता मिशन गुलाल घ्यायचे असे ठरवून प्रत्येक उमेदवार पळू लागला आहे.
आपल्या पॅनेलमधून उमेदवारी कुणाला द्यायची, हे ठरविण्यासाठी चक्क एक नियम ठरविण्यात आला होता. तो नियम म्हणजे पॅनेलला (पार्टी फंड) निधी दिलाच पाहिजे. शाळेत शिक्षक म्हणून नोकरीवर घेताना शासनाने शिक्षणाची, पदवीची अट ठेवली होती. परंतु याच शिक्षकांनी निवडणुकीत पार्टीचा उमेदवार ठरविताना केवळ पैशाचीच अट ठेवल्याची चर्चा खुमासदारमपणे शिक्षकांच्यात सुरू आहे.
तब्बल ३८ अपक्ष रिंगणात
पार्टी फंड मागणीमुळेच कराड- पाटण शिक्षक सोसायटी निवडणूकीत तब्बल 38 जण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. सत्ताधारी व विरोधक यांच्यासह अनेक शिक्षक पुढाऱ्याचा कारभार चुकीच्या दिशेने जात आहे. अशावेळी दोन्ही गट नको म्हणून अपक्षांनी चांगलेच वातावरण तापवलेले पहायला मिळत आहे.