कराडला यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा आणि सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते सहकारी पतसंस्था अडचणीत आली आहे. राज्याच्या सहकारी चळवळीला दिशा देणारे माजी सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांच्या नावाने असलेल्या या संस्थेत कोट्यावधींच्या ठेवी या पतसंस्थेत अडकल्या आहेत. त्यामुळे ठेवीदार शेतकरी ही अडचणीत आले आहेत. या ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार आक्रमक झाले आहेत.

या बेमुदत आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या पतसंस्थेच्या काराभाराविरोधत ठेवीदारांनी कराड येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास भगवान रामनाथ पवार (गोंदी), डाॅ. बबन शंकर पाटील (आटके), शंभूराज चंद्रकांत पाटील (काले), शशिकांत शंकर पाटील (आटके), दिपक पांडूरंग पावणे (कासारशिरंबे) बसलेले आहेत.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात यशवंतराव मोहिते भाऊंनी सहकार वाढवला. त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या पंतसंस्थेत आज कष्टकरी, शेतकरी लोकांच्या ठेवी गेल्या 4 वर्षापासून मुदत संपल्या तरी मिळत नाहीत. भाऊंचे चिरंजीव यांनी संस्था मोडित काढण्याचे काम करून भाऊंच्या नावाला काळीमा फासण्याचे काम केले असल्याचा आरोपही केला.